विधानसभा ; शिर्डीत तांबे, श्रीगोंद्यात नागवडेंचा दावा!


माय नगर वेब टीम

अहमदनगर -
लोकसभा निवडणुकी अगोदर भाजपवासी झालेले ना. राधाकृष्ण विखे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघात कोंडीत पकडण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार काल (दि.29) काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीत सत्यजित यांच्यावतीने त्यांचे वडील आ. डॉ. सुधीर तांबे यांनी निरीक्षकांकडे अर्ज सादर केला. दुसरीकडे श्रीगोंद्यातून राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेने अनुराधा नागवडे यांनी उमेदवारीवर दावा केला. दरम्यान जिल्ह्यात 2009 चा 5/7 फॉर्म्युला विधानसभेत वापरण्याची मागणी होत आहे.



विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये पक्षनिरीक्षक माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी आ.डॉ. सुधीर तांबे, आ. भाऊसाहेब कांबळे, पक्षाचे पदाधिकारी हेमंत ओगले, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषाकिरण चव्हाण, प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आदी उपस्थित होते. मुलाखतीमध्ये विधानसभेच्या 12 जागांसाठी 43 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात शिर्डीतून सर्वाधिक 10, श्रीरामपूरातून 9 आणि नगर शहर मतदारसंघातून 6 इच्छुक आहेत.


संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात हे एकमेव इच्छुक आहेत. कोपरगावातून अशोक खांबेकर यांनी इच्छा दर्शविली आहे. पारनेरमधून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गंगाधर शेळके यांनी, तर श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे यांनी मुलाखत दिली. मुलाखतीच्या सुरुवातीस उपस्थितांना अर्ज देवून उमदेवारी मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हे अर्ज एकत्र करून निरीक्षकांकडेे देण्यात आले.


निरीक्षक जोशी यांनी तालुकानिहाय इच्छुकांच्या एकत्रित मुलाखती घेतल्या. मुलाखती दरम्यान, ही निवडणूक का लढण्यास इच्छुक आहे? पक्षासाठी संबंधितांचे योगदान, यापूर्वी असणारे पद, विरोधकांची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
2009 सालची विधानसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित लढविली होती. त्यानुसार राष्ट्रवादी 7 व काँग्रेसला 5 जागा होत्या. 2009 सालचा हाच ‘फॉर्म्युला’ यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पाच जागांमध्ये संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, श्रीगोंदा आणि नगर शहर या जागांचा समावेश आहे.

इछुक उमेदवार

शिर्डी - राजेंद्र निर्मळ, दत्तात्रय खुळे, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, शिवाजीराव थोरात, मिनानाथ वर्पे, दत्ता खुळे, रावसाहेब बोठे, लता डांगे. श्रीरामपूर - आ. भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब डोळस, रवि डोळस, विजय खाजेकर, विलास खाजेकर, भिकाजी रणदिवे, राजेंद्र वाघमारे, जगन्नाथ आव्हाड, हेमंत ओगले. नेवासा- राजेंद्र वाघमारे, जयवंत गुडघे, दिगंबर शिंदे, शेख जाकीर. शेवगाव-पाथर्डी- काझी समद अहमद, शेख शाहबुद्दीत हशमुद्दीन, अमोल फडके. राहुरी - बाळासाहेब आढाव, बाबासाहेब धोंडे, दीपक पठारे, पंढरीनाथ पवार. नगर शहर- दीप चव्हाण, शामराव वाघस्कर, बाळासाहेब भुजबळ, फिरोज शफीखान, उबेद शेख, शेख मोहमंद हनीफ अब्बास. कर्जत-जामखेड - मिनाक्षी साळुंके, प्रवीण घुले, किरण पाटील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post