जलशक्ती अभियानात अहमदनगर जिल्ह्याने देशासमोर आदर्श ठेवावा- रिचा बागला




माय नगर वेब टीम

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा हा विविध सामाजिक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमात कायमच देशासमोर आदर्श निर्माण करत आला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानातही हा जिल्हा अग्रेसर असेल आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून इतरांसमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांनी व्यक्त केला. जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवड झालेल्या पाच तालुक्यात जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यामध्ये चांगले काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान (JSA) राबविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. या अनुषंगाने या अभियानाची प्राथमिक तयारी करुन घेण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाच्या सहसचिव रिचा बागला यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथकाने आज शिर्डी येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गटस्तरावरील कामांचे संनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून केंद्र सरकारमधील संचालक सुप्रिया देवस्थळी, तांत्रिक बाबींचे सनियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून केंद्रीय जलसंशोधन केंद्र , पुणे येथील ए. के. आगरवाल यांचा या पथकात समावेश आहे. तेही या बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी कीर्ति जमदाडे-कोकाटे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख, पाचही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्रीमती बागला यांनी जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींचा जिल्हास्तरावर केलेल्या आराखड़्याबाबत चर्चा केली. लोकसहभाग वाढावा, विविध यंत्रणांनी त्यांची कामे सुनियोजित पद्धतीने पूर्ण करावीत. निवड केलेल्या पाच तालुक्यातील भूजलपातळी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, त्यासाठी पाऊसपाणी संकलन मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नगरपालिका , ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्थांनी पाऊसपाणी संकलनासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

शालेय पातळीवर यासंदर्भात जाणीवजागृती व्हावी, यासाठी विद्‌यार्थ्यांच्या माध्यमातून जलशक्ती अभियानाचा उद्देश आणि त्याचे होणारे सकारात्मक परिणाम यावर निबंध, चित्रकला स्पर्धासारखे उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने पाचही तालुक्यातील पुनर्जिवीत करण्यायोग्य विंधनविहिरींचे सर्वेक्षण करुन कामे सुरु करावीत. स्थानिक पातळीवर कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाची गरज असते. त्याअनुषंगाने काम करण्याची सूचना त्यांनी केली. श्रीमती देवस्थळी यांनी जलशक्ती आणि जनसहभाग हा धागा धरुन या अभियानाची आखणी केल्याचे सांगितले. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अधिकाधिक काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्आगरवाल यांनी, पाण्याचं महत्व सगळ्यांना आहे. ते महत्व या अभियानाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी श्री. वाघ यांनी जिल्हास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या आराखडा अंमलबजावणीबाबत संबंधितांना माहिती दिली.

या बैठकीस वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, शिक्षण, नगरपालिका प्रशासन आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन मिळून हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना, चेक डॅम, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन, पारंपरिक पाणीयोजना, तळी आदी संरचनांचे नूतनीकरण तसेच विहीरी आणि विंधनविहीरी पुनर्जिवीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना अशा पद्धतीने कामे होणार आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नैसर्गिक संसाधन व जलसंधारण संबंधित कामांचे उद्दिष्ट्य साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगानेही आजच्या बैठकीत चर्चा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post