आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन राबविणार भूजल पुनर्भरण उपक्रम ; भातोडी गाव घेतले दत्तक


 रविवारी होणार उपक्रमाचा शुभारंभ
 माय नगर वेब टीम
अहमदनगर  - नगर तालुक्यातील भातोडी पारगाव हे गाव दुष्काळ मुक्त करण्यासाठी या गावात आर्किटेक्टस, इंजिनिअर्स अॅण्ड सव्हेअर्स असोसिएशनच्या वतीने भूजल पुनर्भरण उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी संस्थेने हे गाव दत्तक घेतले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी (दि.१६) होणार असल्याची माहिती संस्था अध्यक्ष सलीम शेख, सचिव आदिनाथ दहिफळे, उपाध्यक्ष विजयकुमार पादिर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की,नगर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरात भातोडी हे गाव आहे. गावाला लागून एक नदी तसेच जवळच 700 एकरचा ऐतिहासिक तलाव आहे. या ठिकाणी नृसिंहाचे सुंदर मंदिर, शरीफजी महाराजांची समाधी आहे. परंतु आज त्या गावाची पाण्याची पातळी अडीचशे फूट खोल गेली आहे. याला कारणही खूप सोपे या गावात पाऊस तर पडतो परंतु गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या तलावामध्ये पाणी साठते पण गाळामुळे वाहून जाते किंवा त्याचे बाष्पीभवन होते. गावाची परिस्थिती इतकी खराब आहे की एका परिवाराला पाचशे लिटर पाणी दहा दिवसा करता मिळते व दररोज तीन टॅकर सरकारी विहिरीमध्ये सोडले जाते. लहान मुली, मुले व स्त्रिया दिवसभर पाण्यासाठी भटकंती करून तहान भागवतात.त्यामुळेच आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स अॅण्ड सव्हेअर्स असोसिएशन, अहमदनगरच्या सर्व सभासदांनी मिळून दुष्काळाशी सामना करण्यात या गावाची मदत करण्याचे ठरवले आहे व एक प्रयोग म्हणून नदीचा तीन किलोमीटरचा पट्टा आडवी चारी मारून, काही पट्टा नांगरून व काही पट्टा जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करुन या नदीतील सगळ्या मातीचे आवरण दूर करणार आहोत, यामुळे पावसाचे पाणी जे नदीमध्ये जमा होते ते जसेच्या तसे जमिनीत मुरण्यास मदत होईल व नदीच्या शेजारी असलेल्या सर्व विहिरी व कुपनलिका यांना पाणी येईल.

यासाठी बराचसा वेळ व बराच पैसा लागणार आहे तरी आमची एक इंजिनियर टीम या गावांमध्ये सतत जाऊन त्या गावांच्या खडकांचा अभ्यास करून व व भूजल पातळीची सध्याची स्थिती पाहून त्यावर ती काम करू इच्छित आहे या सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वानी खारीचा वाटा उचलला तर अशक्य असे काहीच नाही.त्यासाठी रविवारी (दि.१६) नगरकर, भातोडी पारगाव येथील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऐसा संस्थेने केले आहे. याबाबत भातोडी पारगाव ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. तसेच या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संस्था सभासद, बांधकाम सप्लायर्स तसेच नगरकर यांनी निधी दिला आहे. इच्छुक नगरकर यांनी या उपक्रमासाठी 8669698181 व 8669698787 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post