प्रदेश बैठक ; विखे पाटलांना काँग्रेसकडून आमंत्रण


माय नगर टीम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसची विशेष बैठक शुक्रवारी (१० मे) दुपारी २ वाजता मुंबईतील टिळक भवनात होणार आहे. नगर जिल्ह्यातील राजकीय व दुष्काळाच्या विषयावर होणाऱ्या या बैठकीस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित राहतात की नाही, याची उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

प्रदेश काँग्रेसच्या शुक्रवारच्या बैठकीस अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात व भाऊसाहेब कांबळे तसेच विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभेच्या नगर व शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपकडून उमेदवारी करीत असलेले चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचा नगरमध्ये तर शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा शिर्डीत प्रचार केला आहे. चिरंजीवाने भाजपची उमेदवारी घेतल्यानंतर त्यांनी लगेच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधींकडे पाठवला होता.

मात्र, नगरचे मतदान होईपर्यंत पक्षाने त्याची दखल घेतली नाही. पण शिर्डी मतदारसंघात विखेंनी शिवसेना उमेदवाराचे काम सुरू केल्यावर तातडीने विखेंचा राजीनामा पक्षाकडून स्वीकारला गेला. पण अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे तो पाठवला गेला नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीस विखे उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post