माय नगर वेब टीम
अहमदनगर
अहमदनगर विभागातील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण अधिकारी ठराविक तक्रारदाराला हाताशी धरुन उद्योजकांच्या तक्रारी करुन त्रास देऊन उद्योग बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणाची कैफीयत एमआयडीसीतील उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समोर मांडली असून याची आमदार संंग्राम जगताप यांनी गांर्भीयाने दखल घेत अहमदनगर विभागातील भ्रष्ट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकारी हा बेकायदेशीर कारभार करत असून या अधिकार्याची चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या मागणीचे पत्र आ. जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
निवेदनात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, नगर शहर औद्योगिक वसाहतीत प्रदूषण नियंत्रण अधिकार्यामार्फत ठराविक तक्रारदाराला हाताशी धरून तक्रारी करून उद्योजकांना त्रास दिला जातो. तसेच उद्योग बंद करण्याचा धमक्या दिल्या जातात.
उद्योग बंद करता येईल, असे कायदेशीर कागदपत्रे तयार केले जातात. ज्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. नंतर येथील अधिकाऱ्यामार्फतच निरोप देण्यात येतो की, तुम्ही तक्रारदाराला भेटून प्रकरण मिटवून घ्या. तक्रारदाराला भेटल्यास तो मोठ्या रकमेची मागणी करतो. विशेष म्हणजे हीच व्यक्ती कायम नगर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या तक्रारी करत असते.
नगर येथील विभागीय अधिकारी पाटील हे मुजोर अधिकारी आहेत. उद्योजकांशी ते व्यवस्थित बोलत नाहीत. ही बाब गंभीर आहे. उद्योजकांमध्ये उद्योग वाढीच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार करायचे असल्यास अशा भ्रष्ट अधिकार्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.

Post a Comment