होम ग्राऊंडवरच रोहीत पवारांचा पालकमंत्र्यांना दणका



माय नगर वेब टीम

अहमदनगर - रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ जास्त असताना देखील राम शिंदे यांनी फोडाफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादीला शह देण्याची खेळी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंचायत समिती सदस्या साधना कदम यांना भाजपमध्ये प्रवेश देत सभापती पदासाठी पुढे करण्यात आले. ठरल्याप्रमाणे भाजपने पाठींबा देत कदम यांना सभापती निवडीत विजयी केले. मात्र साधना कदम यांनी निवड होताच भाजपचा सत्कार न स्वीकारता थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची भेट घेतली. त्यामुळे रोहित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी पालकमंत्र्यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या राजकारणात फोडाफोडीकरत अनेक ठिकाणी भाजपने सत्ता हस्तगत केली आहे, हाच पॅटर्न राबवत राम शिंदे यांनी कर्जत पंचायत समितीत राष्ट्रवादीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहित पवार यांच्या चाणाक्ष खेळीने शिंदे यांचा डाव उलटला आहे.

कर्जतचे विद्यमान आ. पालकमंत्री राम शिंदे यांना पहिल्याच लढाईत धक्का देत रोहित पवार यांनी विजयी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला रोहित यांनी कर्जतमध्ये ब्रेक देखील लावला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post