
माय नगर वेब टीम
अहमदनगर: सार्वजनिक रस्त्यावर घाण पाणी टाकण्यावरून कोतवाली पोलिसांनी शहरातील दोघांना अटक केली. संतोष टेके आणि आरिफ खान या दोघांविरुद्ध ही कारवाई झाली आहे. नगर-पुणे रोडवरील माळीवाडा आऊट गेट येथील उज्वला कॉम्प्लेक्ससमोर ही कारवाई आज सकाळी आठ वाजता केल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दिली. रस्त्यावर घाण पाणी टाकल्याने दोघांना जेलवारी झाली असल्याने इतरांनी याचा चांगलाच धडा घेतला आहे.
संतोष शेळके याची खाद्यपदार्थांचे हातगाडी आहे. या हातगाडीवरचे घाण पाणी आरिफ खान रस्त्यावर फेकून देत होता. या प्रकारचे चित्रीकरणही कोतवाली पोलिसांकडे आहे. त्यानुसार पोलिसांनी आरिफ खान याला ताब्यात घेतले. त्याने हे घाण पाणी हातगाडी मालक संतोष टेके याच्या सांगण्यावरून फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी खान याच्या माहितीवरून टेकेलाही ताब्यात घेतले. टेके आणि खान या दोघांविरूद्ध पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदवून अटक केली. जामीन पत्र गुन्हा असल्याने या दोघांना पोलिसांनी जामिनावर सोडले आहे. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांना प्रत्येकी दीड हजार, असा तीन हजार रुपयाचा दंड होईल. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल, अशी माहिती विकास वाघ यांनी दिली. शहर पोलिसांनी पहिल्यांदाच अशी कारवाई केली आहे. नगर शहरांमध्ये अशाप्रकारे रस्त्यावर घाण पाणी आणि कचरा टाकण्याचे, त्याचबरोबर तो जाळण्याचे अनेक प्रकार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी, अशी कारवाई सातत्याने झाली पाहिजे, अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत.
Post a Comment