समतेसाठी संघर्ष हीच कॉम्रेड संत यांना श्रद्धांजली
अहमदनगर :
वाढत चाललेली समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता ,जातीयता आणि धर्मांधता, तसेच दारिद्र्य आणि बेरोजगारी यामुळे संपूर्ण भारत देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. अशा परिस्थितीत समता युक्त , विषमता आणि शोषणमुक्त समाजासाठी प्रयत्न करणे हीच कॉम्रेड सुरेश संत यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन विविध वक्त्यांनी अमरधाम येथील श्रद्धांजली सभेत केले.
येथील डाव्या पुरोगामी विचारांच्या चळवळीत गेली पन्नास वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे ज्येष्ठ साम्यवादी कार्यकर्ते आणि विचारवंत कॉम्रेड सुरेश विठ्ठल संत ,यांचे आज पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या मागे 3 विवाहित मुले, 1मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
आज दुपारी चार वाजता कॉम्रेड संत यांना अमरधाम येथे अखेरचा लाल सलाम करण्यात आला.
यावेळी नगरचे माजी आमदार दादा कळमकर, दलित वंचित समूहाचे नेते अशोक गायकवाड ,कॉम्रेड अरुण कडू, एडवोकेट कॉम्रेड सुभाष लांडे, कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली , कॉम्रेड एडवोकेट बन्सी सातपुते, प्रा. सुभाष कडलग , एडवोकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर, चंद्रकांत रेणाविकर , निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे , मराठा विद्या प्रसारक समाजाचे पदाधिकारी रामचंद्र दरे ,श्रीमती नीलिमाताई काटे सौ लता डांगे ,कॉम्रेड भाऊसाहेब थोटे, कॉम्रेड गंगाधर पाटील जाधव,
आदींनी कॉम्रेड सुरेश संत यांच्या प्रेरक आठवणी सांगितल्या.
कॉम्रेड संत यांच्या विचारांना अनुसरून त्यांचे कुठलेही धार्मिक विधी होणार नसल्याचे संत परिवारातर्फे यावेळी सांगण्यात आले.स्नेहालय परिवारातर्फे डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी शोकसभेचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment