‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटाचा मोठा दावा

 


माय नगर वेब टीम 

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधीच राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून चर्चांना उधाण आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं संख्याबळ वाढवून शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे महायुतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवावं, अशी प्रत्येक शिवसैनिकाची आणि सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आपण स्वतः, शिवसेनेचे नेते आनंद परांजपे आणि पक्षातील तळागाळातील कार्यकर्तेही शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छित असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. 

एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री का आहेत, याबाबत बोलताना सरनाईक यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांचा संदर्भ दिला. संख्याबळाच्या समीकरणामुळे शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपलं संख्याबळ वाढवेल आणि शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा चर्चा?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. आता दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नेस्को सेंटर येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे या वक्तव्यावर काही भाष्य करतात का आणि महायुतीतील भाजपसह इतर मित्रपक्षांची यावर काय भूमिका असते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post