माय नगर वेब टीम
जालना : बीडमधील नारायण गडावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दोन अत्यंत गंभीर आणि सनसनाटी दावे करत राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडवून आणला आहे.
आपल्याला संपवण्यासाठी थेट हत्येचा कट रचला गेला होता आणि त्याचे भक्कम पुरावे आपल्या हाती लागले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्याचबरोबर, आंदोलनाची धार कमी करण्यासाठी आपल्याला तब्बल ५०० कोटी रुपये दिल्याचा कांगावा करत भाजप आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
मनोज जरांगे यांनी उपस्थित जनसागराला संबोधित करताना सांगितले की, त्यांच्याकडे अशी एक गुप्त चर्चा आली आहे जी ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकेल. सुमारे ३० ते ४० मिनिटांच्या या संभाषणात जरांगेंना कसं मारायचं, याचे नियोजन चर्चिले गेले होते. या संपूर्ण कटामागे एका माजी मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांना ‘बाप’ मानणाऱ्या या माजी मुख्यमंत्र्याने जरांगेंवर इतकी भयानक कमेंट केली आहे की, त्या पक्षातील नेत्यांनी ती ऐकली तर ते उद्याच पक्षाचा राजीनामा देतील, असा इशारा जरांगेंनी दिला. या संभाषणावरून आपल्याला संपवण्यासाठी सत्ताधारी वर्गाने किती खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला, हे उघड होत असल्याचं ते म्हणाले.
हत्येच्या कटासोबतच ५०० कोटींच्या कथित देवाणघेवाणीवरूनही त्यांनी राजकीय वर्तुळात नवा संशय निर्माण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना सांगताना जरांगेंना ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा घडवून आणली, असा दावा त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले, ते खा. श्रीकांत शिंदेंकडे दिले आणि त्यांच्यामार्फत जरांगेंना पोहोचवले, अशी आवई भाजपच्या अंतर्गत वर्तुळात उठवली जात असल्याचे जरांगे म्हणाले.
मला जर खरंच ५०० कोटी मिळाले असते, तर मी ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वाटून टाकले असते, असे ठणकावून सांगत त्यांनी सवाल उपस्थित केला की, भाजप नक्की कोणाचा गेम करू पाहत आहे? भाजपला मला संपवायचे आहे की शिंदेंचा राजकीय बळी घ्यायचा आहे, याचा छडा लावल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.
केवळ हत्येचे कट आणि पैशांचे आरोपच नव्हे, तर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकांवरही जरांगे पाटलांनी सडकून टीका केली. राज्य सरकारची कॅबिनेट ही लोकांच्या हितासाठी नसून केवळ आपल्या विरोधात व्यूहरचना आखण्यासाठी भरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आणि कुणबी एकच आहेत यावर निर्णय होणे अपेक्षित होते.
मात्र, मराठा समाजातीलच काही मंत्र्यांनी ‘जे देता येतं तेच द्या, जे शक्य नाही त्याला थेट नाही सांगा’ अशी भूमिका घेतली. सरकारची हीच वृत्ती पुढे जाऊन मराठ्यांचे आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे आणि शेतकऱ्यांची मदत नाकारण्यापर्यंत पोहोचेल, असा थेट इशारा देत जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Post a Comment