दीनानाथ रुग्णालयावर खासदार लंके यांचे गंभीर आरोप; प्रियांशी मृत्यूप्रकरणी वैद्यकीय व्यवस्थेसह इमारतीच्या संरचनात्मक तपासणीची मागणी




३२ कोटींच्या थकबाकीचाही मुद्दा ऐरणीवर

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर :    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिचा झालेला मृत्यू प्रकरण अधिकच गंभीर बनत असून, खासदार नीलेश लंके यांनी आता रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीसोबतच रुग्णालय इमारतीच्या बांधकाम व संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

          पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन शुक्रवारी खा. लंके यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय, प्रशासकीय आणि बांधकामविषयक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा येथील रहिवासी असलेल्या सहा वर्षीय प्रियांशी बागडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी पुणे महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनात रुग्णालयातील वैद्यकीय कार्यपद्धती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, रुग्ण सुरक्षा तसेच प्रशासनिक उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

         लंके यांनी पत्रात नमूद केले आहे की, यापूर्वीही संबंधित रुग्णालयावर उपचारांतील विलंब, प्रशासनिक त्रुटी आणि रुग्णांशी असंवेदनशील वर्तनाबाबत आरोप झालेले आहेत. त्यामुळे सद्य घटना ही केवळ एक अपवादात्मक दुर्घटना नसून रुग्णालय व्यवस्थापनातील प्रणालीगत त्रुटींचे द्योतक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

           याचबरोबर रुग्णालयाच्या इमारतीबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. मंजूर बांधकाम आराखड्याच्या विरोधात अतिक्रमण, अनधिकृत वाढीव बांधकाम किंवा नियमबाह्य संरचनात्मक बदल झाल्याची माहिती स्थानिक स्तरावरून मिळत असल्याचा दावा लंके यांनी केला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील सार्वजनिक संस्थेमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी असल्यास हजारो रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे रुग्णालयाच्या अधिकृत बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे आणि प्रत्यक्ष उभारण्यात आलेल्या बांधकामाची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इमारतीचे स्वतंत्र ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून सुरक्षिततेबाबत अधिकृत अहवाल सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

           अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरमधील सुरक्षा निकष यांची विशेष तपासणी करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालय प्रशासनाने महानगरपालिकेकडून मिळालेल्या सर्व परवानग्या आणि सुरक्षा प्रमाणपत्रांचे पालन केले आहे का, याची चौकशी व्हावी, असेही लंके यांनी स्पष्ट केले.

          वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक प्रवेशमार्ग आणि नागरी सुविधा नियमांचे पालन होत आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत नियमभंग किंवा अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका खासदार लंके यांनी घेतली आहे. दरम्यान, रुग्णालयाकडे पुणे महानगरपालिकेची सुमारे ३२ कोटी रुपयांची थकीत देयके असल्याची माहिती समोर आल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. या देयकांचे स्वरूप, वसुली प्रक्रिया आणि संबंधित प्रशासकीय बाबींची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

           याशिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रुग्णालयाला कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा योजनांमधील आर्थिक सहाय्य देऊ नये, अशी मागणीही खासदार लंके यांनी केली आहे. प्रियांशी बागडे हिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या प्रकरणामुळे राज्यातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post