गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार आक्रमक
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : डोंगरगण येथील शेतजमिनीच्या खरेदीखतासाठी बोगस इसम उभा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र १५ दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त तक्रारदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांची भेट घेत निवेदन सादर केले.
कमल पद्माकर शिरसाट, स्नेहा नरेंद्र शिरसाट, राजेंद्र शिरसाट आणि सागर शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात मोठ्या बनावटगिरीचा आरोप करण्यात आला आहे. मनोज भाऊसाहेब कराळे, राहुल प्रकाश मांढरे, जुनेक रफिक इनामदार, विनोद उबाळे तसेच “भिमराव भाऊ चक्रनारायण” या नावाने समोर आणलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून संगनमताने हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे “भिमराव भाऊ चक्रनारायण” हे नावच बनावट असून मूळ आरोपीची खरी ओळख अद्याप समोर आलेली नसल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
निवेदनानुसार, भाऊ नागोबा चक्रनारायण यांना “भिमराव” नावाचा मुलगा कधीच नव्हता. तरीही बनावट वारस उभा करून त्याच्या नावाची वारस नोंद महसूल अभिलेखात करण्यात आली. त्यानंतर त्याच आधारावर डोंगरगण येथील शेतजमिनीचे खरेदीखत करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने स्वतःचे वय ७५ वर्षे दाखवत शिरूर नगरपालिकेतून जन्म दाखला मिळवल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जन्म दाखल्यावर नवजात बालकाचे नाव नसते; मात्र संबंधित दाखल्यात “भिमराव” हे नाव नंतर समाविष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिरूर नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बनावट जन्म दाखल्याच्या आधारे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली. सर्व कागदपत्रांच्या तारखा आणि नोंदींची चौकशी केल्यास संपूर्ण बनावटगिरी उघड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच संबंधित आमची मोठ्या मंत्र्यांशी ओळख असून अर्ज मागे घेण्यासाठी फिर्यादीवर दबाव आणत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
२२ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन देत संबंधितांवर फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, संगनमत आणि जमीन व्यवहारातील गैरप्रकार यांसारख्या गंभीर कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील महसुली कागदपत्रे आणि इतर पुरावे अधिकाऱ्यांनी तक्रारदारांकडून मागवून घेतले असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डोंगरगण जमीन व्यवहार प्रकरण आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment