शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन / अक्षय कर्डिले यांना जनतेच्या सेवेसाठी संधी द्या - महापौर ज्योतीताई गाडे
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे या आपल्या लहान भावासाठी म्हणजेच भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
पाथर्डी तालुक्यातील तब्बल 39 गावांचा झंजावाती दौरा करत त्यांनी कडक उन्हात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. गावागावात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांनी अक्षय कर्डिले यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की, त्यांच्या दुःखद निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली तसेच नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत विश्वासाचे नाते निर्माण केले.
महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, “अक्षय कर्डिले यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जनतेत जाऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांना जनतेच्या सेवेसाठी आमदारकीची संधी देणे गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे अपूर्ण राहिलेले विकासाचे स्वप्न अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
दौऱ्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे ठळकपणे समोर आले. गावागावात नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची जाण करून घेतली, महिलांशी विशेष संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या, युवकांशी चर्चा करून रोजगार व विकासाच्या संधींबाबत आश्वासन दिले, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत विकासकामांद्वारे त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली.
या झंजावाती दौऱ्यामुळे पाथर्डी तालुक्यातील वातावरण अक्षय कर्डिले यांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महापौर ज्योतीताई गाडे यांचा आक्रमक प्रचार यामुळे भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे बोलले जात आहे.
एकूणच, कडक उन्हातही सुरू असलेला हा प्रचार दौरा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत असून येत्या निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment