महाराष्ट्रात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

 


माय नगर वेब टीम

मुंबई : राज्यात कडाक्याच्या उन्हाचा चटका जाणवत असतानाच आता निसर्गाने आपले रूप बदलले असून, पुढील चार दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुढील चार दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात केवळ पाऊसच नव्हे, तर सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


साताऱ्यात गारांचा पाऊस –

पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडला. साताऱ्यात दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सातारा शहर आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यांवरील वाहतुकीची मोठी तारांबळ उडाली. एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या संकटामुळे कामावरून घरी परतणाऱ्यांची धावपळ झाली. पुण्यातही दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळच्या सुमारास गारांच्या पावसाने हजेरी लावली.


दुहेरी हवामानाचा सामना  –

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांगली, सोलापूर, सातारा या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, परभणी, बीड आणि विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, विदर्भात एकीकडे पावसाचे सावट असताना दुसरीकडे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भवासीयांना एकाच वेळी उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस अशा दुहेरी हवामानाचा सामना करावा लागणार आहे.


हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करावे –

या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांची तात्पुरती सुटका झाली आहे. साताऱ्यात तर लहान मुलांसह नागरिकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post