राहुरीत विजय संकल्प सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्राजक्त तनपुरे यांचे भाजपमध्ये स्वागतच - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक; बूथ प्रमुखांनी योजना जनतेपर्यंत पोहोचवा
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख करत सांगितले की, त्यांच्या नेतृत्वामुळे देश व राज्यात विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळेच जनतेचा त्यांच्यावर विश्वास असून प्रेमही वाढले आहे.
ते पुढे म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तर त्यांचे स्वागतच आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवावे. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल.
रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर अक्षय कर्डिले यांना विजयी करणे आवश्यक आहे. पक्षाशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी.
ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुळा धरणाची उंची वाढविणे व गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच या भागातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील. अक्षय कर्डिले हे युवा नेतृत्व असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
“आता प्रचाराच्या सभा कमी होतील, मात्र कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा, विकासकामांची माहिती द्यावी. सध्या उष्णतेची लाट असल्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र कोणतीही निवडणूक सोपी नसते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाव सोडायचे नाही आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे आहे.
ते पुढे म्हणाले की, कर्जमाफी, वीज बिल सवलत, लाडकी बहीण योजना, सौर ऊर्जा योजना यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच तालुक्यातील सुमारे आठ हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठ परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे हीच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, ही निवडणूक सार्वत्रिक नसून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरता पाठिंबा दिला आहे, आता त्यांनी अधिकृत पाठिंबा द्यावा.
ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय कर्डिले यांनी सामान्य जनतेचा आवाज बनून काम केले. पाणी, विकास आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी शासन पार पाडत आहे. . पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
या सभेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आभार मानले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून द्या. माझ्यावर टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे जर भाजपमध्ये आले, तर आम्ही दोघे मिळून राहुरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू.
या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार विक्रम पाचपुते, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सत्यजित कदम आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख उपस्थित होते.
एकूणच, या विजय संकल्प सभेमुळे राहुरी मतदारसंघात भाजप महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीभोवती जनसमर्थन अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.



Post a Comment