स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे विकासस्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी - मुख्यमंत्री



अक्षय कर्डिले यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन; सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमआयडीसी, उड्डाणपूल, वीज, कर्जमाफीसह विकासाचा मोठा आराखडा जाहीर

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भव्य जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकासस्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वतः घेत असल्याची ठाम ग्वाही दिली. “ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक आहे. अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजे स्व. कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे ते म्हणाले.



मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “राहुरीतील उड्डाणपूल, एसटी डेपो यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याच्या तिजोरीचा ‘बिअरर चेक’ मी अक्षय कर्डिले यांना देत आहे. त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील.” तसेच कृषी विद्यापीठाच्या अतिरिक्त १००० एकर जागेवर एमआयडीसी उभारून मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.



या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, दिवसा मोफत वीज पुरवठा, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचा सातत्याने लाभ देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. महिला आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.



स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री भावूक झाले. “ते दिलखुलास, संघर्षशील आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते होते. दररोज ६० ते १०० किलोमीटर फिरून त्यांनी जनतेशी नाळ जपली. विपरीत परिस्थितीतही ते कधी झुकले नाहीत. त्यांच्या प्रत्येक गावापर्यंत समृद्धी पोहोचवण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू,” असे ते म्हणाले. मुळा धरणातील गाळ काढून तीन टीएमसी पाणीसाठा वाढवण्याचे कामही हाती घेतले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्व. वडिलांचे अपूर्ण राहिलेले विकासस्वप्न पूर्ण करण्यासाठी मला संधी द्या. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत त्यांच्या वारशाला न्याय देईन.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “आपण दुःखद परिस्थितीत निवडणूक लढवत आहोत. अक्षय कर्डिले यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असून विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल आभारही व्यक्त केले.



विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनीही “विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय कर्डिले यांना पूर्ण ताकद द्या,” असे आवाहन केले.

सभेत युवा नेते संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, प्रसाद लाड, अमोल खताळ, काशिनाथ दाते, महापौर ज्योतीताई गाडे, तसेच दिलीप भालसिंग, सत्यजित कदम पाटील, अलका कर्डिले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच, या जाहीर सभेतून भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी जनतेचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post