माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - घारगाव (ता. संगमनेर) येथील मुळा नदीच्या पुलावरुन फेकलेल्या 3 महिन्याच्या चिमुकल्याचे मारेकरी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. आई-वडिलांनी खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दि. 4 डिसेंबर रोजी आंबीखालसा येथील एका व्यक्तीस मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडुपांमध्ये 3 महिने वयाच्या बालकाचा मृतदेह दिसून आला होता. त्यावरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास केला. प्रथमदर्शनी हा प्रकार घातपाताचा असल्याचे दिसून आले. चिमुकल्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरीता वापरण्यात आलेली कार आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना येथील असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली. गुन्हे शाखेने भोकरदन परिसरात जाऊन माहिती घेतली. माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव (वय 37, रा. भिवपुर, पो. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना), कविता प्रकाश जाधव (वय 32), हरिदास गणेश राठोड (वय 32, रा. आव्हाना, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्याकडे चौकशी केली. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. प्रकाश जाधव व त्याची पत्नी कविता जाधव यांनी त्यांचा मुलगा शिवांश उर्फ देवांश (वय 3 महिने) यास हरिदास गणेश राठोड याच्या कारमधून दि.3 डिसेंबर रोजी पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घारगाव (ता. संगमनेर) परिसरात पुलाजवळ कार थांबवून कारचा चालक व प्रकाश जाधव यांनी बाळ बरे होणार नसल्याच्या कारणावरुन त्यास मारुन फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधली. त्यानंतर शिवांशचा गळा दाबून व त्याच्या अंगावरील कपडे काढुन त्यास पुलावरुन खाली फेकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर कार ताब्यात घेतली आहे. शिवांश उर्फ देवांश याचा खून करुन त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर याची गावात चर्चा होऊ नये म्हणून त्याचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेले असून तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऍ़डमिट असल्याचे भासविले. तसेच त्याच्या आईस गावातील लोक विचारतील म्हणून तिला वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाकरीता पाठविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास घारगाव पोलिस करीत आहेत.

Post a Comment