पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माय नगर वेब टीम
पारनेर : उर्जा प्रकल्पांवर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबावतंत्र वापरण्याची मालिका थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सौर उर्जा प्रकल्पात अलिकडेच घडलेले सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खंडणी प्रकरण, त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असतानाच पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अगदी तशीच घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार हा या गुन्हयातील मुख्य आरोपी असून त्याच्यासोबतच्या ७-८ जणांच्या टोळक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दशहत माजवली. दरोडीतील सेनवियान पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास लाथा बुक्क्यांनी केलेली अमानुष मारहाण, कार्यालयात घुसून केलेली तोडफोड आणि दरमहा दोन लाखांच्या खंडणीची उघड मागणी केली.
१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले रा. कारेगांव, ता. पारनेर येथील रहिवासी दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना मुख्य आरोपी विकास पवार हा अचानक कार्यालयात शिरला. घुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार पवार याने गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या हातातील कोयता थेट गळयाजवळ रोखून धमकावले की, तू येथे कसे काम करतोस ? तुला सांगूनही तू कंपनी बंद का ठेवली नाहीस असा जाब पवार याने विचारला. पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ ७ ते ८ जणांची टोळी दांडकी, दगडांसह कार्यालयात धडकली. त्यांनी अक्षरशः धुडगूस घालत कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या, संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टमची तोडफोड करून नुकसान केले. सिक्युरिटी गार्ड घुले याचा मोबाईल घेऊन तो फोडून टाकला.
मारहाणीच्या दरम्यान विकास पवारने फिर्यादीला धमकावले की, तुझ्या मालकाला सांग पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रूपये मला द्यावे लागतील. पवार धमकीवरच थांबला नाही तर त्याने घुले याच्या खिशातील २२ हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
कार्यालयात धुडगूस चालल्याचे तसेच सिक्युरिटी गार्ड घुले यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच साईड इन्चार्ज किरण पवार हे घटनास्थळी धावून आले. आणि आरोपींच्या तावडीतून घुले याची मुक्तता केली.
यापूर्वीही दमबाजी
दरम्यान, यासंदर्भात ठेकेदार चंद्रभान ठुबे यांनी सांगितले की, आरोपी पवार याने दि. ५ नोव्हेंबर रोजीही कार्यालयात येउन सिक्युरिटी गार्डला दमबाजी केली होती. येथे सर्व कायदेशीर कामकाज सुरू असल्याचे गार्डने पवार यास समजावले होते. पवार व त्याच्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान होत आहे. आपण हे काम सन २०१६ पासून म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून करत आहोत. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी आपणास सिक्युरिटी गार्ड पुरविण्यासंदर्भातील परवानाही दिलेला आहे. गेल्या दहा वर्षात आपल्या कामाविषयी कोणीही संशय व्यक्त केला नाही अथवा कोणी खंडणीही मागितली नाही. कंपनीही आपल्या कामावर समाधानी असल्याचे ठुबे म्हणाले.

Post a Comment