नवी दिल्ली / वृत्तसंस्था -
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्यासाठी गेला सव्वा वर्षाचा कालखंड अत्यंत विपरीत परिस्थितीचा होता. या १५ महिन्यांत त्यांना देशाच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हायला लागले. देशातून परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा खटलाही त्यांच्यावर तालवला गेला. आता याच न्यायाधिकरणाने हसीना यांना मानवताविरोधी गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
कोण आहेत शेख हसीना?
शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी ढाका येथे झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत. हसीना यांनी पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथील शाळेत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात शेख हसीना यांना राजकारणाची फारशी आवड नव्हती. मात्र १९६६ साली ईडन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्या राजकारणात उतरल्या. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवत त्या उपाध्यक्ष बनल्या. नंतर त्यांनी अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व केले.
शेख हसीना यांच्या कुटुंबावर संकट :
१९७५ हे वर्ष शेख हसीना यांच्यासाठी खूप खराब होते. सैन्याने बंड करत त्यांच्या कुटुंबाविरुद्ध उठाव केला. यावेळी झालेल्या चकमकीत शेख हसीना यांचे वडील मुजीबुर रहमान, आई आणि तीन भाऊ यांचा मृत्यू झाला. शेख हसीना त्यांचे पती वाजिद मिया आणि धाकटी बहीण हे युरोपमध्ये होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना आश्रय दिला. त्या दिल्लीत ६ वर्षे राहिल्या.
वडिलांच्या पक्षाचा विस्तार केला…
शेख हसीना १९८१ साली बांगलादेशात परत गेल्या. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या पक्षाचा विस्तार करण्याचे ठरवले. १९८६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले नाही. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांना बहुमत मिळाले आणि त्या पंतप्रधान झाल्या. २००१ मध्ये त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये त्या दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्या. २०१४ मध्ये तिसऱ्यांदा, २०१८ मध्ये चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या. २०२४ मध्ये त्यांना पाचव्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली
शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा :
५ ऑगस्ट २०२४ – जनआंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडून हसीना यांचे भारतात पलायन.
८ ऑगस्ट २०२४ – डॉ. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन
१४ ऑगस्ट – आंदोलनातील जीवितहानीला जबाबदार असलेल्यांवर खटले चालवण्याची हंगामी सरकारची घोषणा
ऑक्टोबर २०२४ – आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद- बांगलादेश पुन्हा कार्यरत
१७ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय लवादाकडून शेख हसीना आणि अन्य ४५ जणांविरोधात अटक वॉरंट जारी.
नोव्हेंबर २०२४ – डिसेंबर अखेरपर्यंत तपास पुर्ण करण्याचे लवादाचे आदेश
फेब्रुवारी २०२५ – आंदोलनात किमान १,४०० जण ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्राचा निष्कर्ष
१ जून २०२५ – लवादासमोरील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात.
१९ जून – हसीनांच्या बाजूने बचाव पक्षाचे वकिल म्हणून एवाय मोपगउझ्झमान यांची नियुक्ती
२ जुलै – हसीनांना त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ६ महिन्यांची शिक्षा
१० जुलै – हसीना, माजी गृहमंत्री असदुझ्झमान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्लाह अल-मामून यांच्यावर सामुदायिक हत्यांचे आरोप निश्चित
३ऑगस्ट – हसीनांच्या अनुस्थितीतच खटल्याची सुनावणी सुरू
२३ ऑक्टोबर – खटल्याची सुनावणी पूर्ण
१७ नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय लवादाकडून हसीना, कमाल आणि मामून दोषी. माफीचे साक्षीदार झालेल्या मामून यांना ५ वर्षांची शिक्षातर हसीना आणि कमाल यांना फाशीची शिक्षा.

Post a Comment