जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगरतर्फे आवाहन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध उपचार सुविधा, सहाय्यक साधने व शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगरचे अध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार व दिव्यांग सक्षमीकरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परवानगीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विळदघाट, अहिल्यानगर येथे २०१८ पासून कार्यरत आहे. फाउंडेशनने या केंद्रासाठी १४ हजार चौ.फु. जागा उपलब्ध करून दिली असून अडथळामुक्त व सर्व सुविधा असलेली इमारत विनामूल्य दिलेली आहे.
या केंद्रामार्फत भौतिकोपचार, वाचा उपचार, श्रवण तपासणी, मानसोपचार, कृत्रिम अवयव निर्मिती व वाटप, बीज भांडवल योजना, निरामय योजना यांसह अनेक सेवा दिल्या जातात. तसेच मे २०२५ पासून येथे “प्रधानमंत्री दिव्याशक्ती केंद्र” सुरू असून दररोज त्वरित सहाय्यक साधनांचे मोफत वाटप केले जाते. केंद्र विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या आवारात असल्याने दिव्यांग व्यक्तींना एकाच ठिकाणी उपचार व वैद्यकीय सुविधा मिळतात.
या केंद्राच्या कार्याचा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ मध्ये पत्राद्वारे गौरव केला आहे. तर महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने” सन्मानित केले.
विशेष उपक्रमांतर्गत दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली जाते. त्यामुळे दिव्यांगांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुनर्वसन केंद्रात उपचार वा सहाय्यक साधनांसाठी पाठविले जाते. ज्यांना सहाय्यक साहित्याची तातडीने गरज आहे, त्यांना ते साहित्य त्वरित व मोफत उपलब्ध करून दिले जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
तसेच केंद्राच्या विविध सुविधा व योजनांची माहिती देणारे फलक जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगरच्या आवारात लावण्यात आले आहेत. “दिव्यांग बांधवांनी शासनाच्या योजनांचा व उपचार सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी केले.
Post a Comment