महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा ; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतला आढावा



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर – महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.

बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कृष्णा एम. सोनवणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. कदम, पोलीस उपअधीक्षक जगदीश भांडाळ, बालकल्याण विकास अधिकारी नारायण कराळे, डॉ. सोनाली बांगर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहरकर, परिविक्षा अधिकारी योगिराज जाधव यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५" या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कायद्यांतर्गत पीडित महिलांना तक्रार कुठे करावी याची अनेकदा माहिती नसते. महिलांना तक्रार करणे सुलभ व्हावे, यासाठी संबंधित तालुका व जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, अंगणवाडी व नागरिकांची वर्दळ असलेल्या सर्व कार्यालयांच्या दर्शनी भागात लावावेत. महिला हेल्पलाईन क्र. १८१ व बालकांसाठी १०९८ बाबत व्यापक जनजागृती करावी.”

  कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायद्यांतर्गत सर्व कार्यालयात अंतर्गत समित्या स्थापन होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

“बेटी बचाओ बेटी पढ़ाओ” ही योजना मुलगी वाचवा आणि तिचे शिक्षण करून समाज सक्षम करा असा संदेश देणारी योजना असून या योजनेची व्यापक जनजागृती करण्यात यावी. जिल्ह्यात वेठबिगार मुलांची शोधमोहिम अधिक व्यापक करण्यात यावी. महिला बालविकास भवन उभारणीमध्ये येत असलेल्या त्रुटींची महानगरपालिकेने तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती, जिल्हा परिविक्षा समिती, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविणारी समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा पुनर्वसन समिती, बालकल्याण समिती, जिल्हास्तरीय प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व मंजुरी समिती तसेच जिल्हा कृतीदल समितीच्या कामकाजाचाही आढावा घेतला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. कदम यांनी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती पॉवरपॉइंटच्या माध्यमातून सादर केली.

बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post