शिर्डीत मोबाईल शॉपी फोडणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद



स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची धडक कारवाई

माय नगर वेब टीम

शिर्डी : दत्तनगर येथील साई समर्थ टेलिकॉम या मोबाईल शॉपीतून १.६२ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत मुद्देमालासह जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ते २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मोबाईल शॉपीचे शटर उचकटून १,६२,४००/- रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २९ सप्टेंबर रोजी शिर्डी-सिन्नर रस्त्यावरील समृद्धी महामार्गालगत एक इसम मोबाईलच्या बॉक्ससह फिरताना पथकाच्या हाती लागला. त्याची चौकशी केली असता तो मनोज यशवंत भोये (वय २०, रा. घोडांबे, ता. सुरगाणा, जि. नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले.

त्याच्या झडतीदरम्यान विविध कंपन्यांचे १.०३ लाख रुपये किमतीचे ९ मोबाईल व एक डेमो मोबाईल जप्त करण्यात आले. हे सर्व मोबाईल शिर्डीतील मोबाईल शॉपी फोडीतील चोरी गेलेले असल्याची खात्री झाली. आरोपीस मुद्देमालासह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. संदीप मुरकुटे, पो.अं. राहुल द्वारके, विजय पवार, सुनिल मालणकर, रमिझराजा आतार व भगवान धुळे यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post