महात्मा गांधी जयंती आणि दसऱ्याचे औचित्य
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : महात्मा गांधीच्या जीवनकार्याचे अत्यंत महत्वाचे पैलू म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेवरील भर आणि सर्वधर्म समभावाची भूमिका. त्यांच्या विचारांमधील या दोन्ही बाबी सामाजिक एकात्मता, आत्मशुध्दी आणि राष्ट्रनिर्मितीशी जोडलेल्या होत्या. हाच आदर्श डोळ्यापुढे ठेऊन खा. नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी जयंती व दसऱ्याचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात स्वच्छ भारत-एकतेचा संकल्प हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानात सामाजिक संस्थांनी, शाळा, कॉलेजातील विद्याथ, स्वयंसेवक, महिला मंडळे तसेच शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महात्मा गांधी पुतळयापासून सुरूवात
या अभियानाची सुरूवात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून होईल. गांधीजींच्या विचारांचा वारसा आणि सत्य-अहिंसेचा संदेश लक्षात घेऊन नागरिकांच्या सहभागातून या उपक्रमास प्रारंभ होणार आहे.
महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता
शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांची प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, समाजसुधारक वस्ताद लहुजी साळवे, शहीद भगतसिंग, हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, आनंदधाम परिसरातील आनंदॠषीजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुतळयांचा समावेश असून सकाळी ११ वाजता माळीवाडयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या अभियानाची सांगता होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पुढील पिढयांपर्यंत महापुरूषांचा वारसा तसेच स्वच्छतेचा आणि एकतेचा संदेश घराघरापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
या अभियानाच्या समारोपप्रसंगी खा. नीलेश लंके यांच्या हस्ते शहरातील सफाई कर्मचारी बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षभर परिश्रम घेणाऱ्या या बांधवांचा गौरव करून समाजातील सर्व घटकांना एक सकारात्मक संदेश देण्यात येणार आहे.
सामाजिक एकतेचे प्रतिक
स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी आवष्यक राही तर ती सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. दसऱ्याच्या या पवित्र दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे. महापुरूषांना अभिवादन करावे आणि स्वच्छ भारत, एक भारत हा संकल्प प्रत्यक्षात आणावा.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
Post a Comment