अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा ; एकही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



अतिवृष्टी नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी /आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे


माय नगर वेब टीम

  अहिल्यानगर - अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील तीन मंडळाच्या ४५  गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे.  आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी व वाळकी या गावात झालेल्या नुकसानीची राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 

यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे आदी उपस्थित होते. 

  पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. 

     खडकी गावामध्ये  ऋषिकेश निकम यांच्या शेतामधील मोसंबीसह इतर पिकाची, शंकूतला तात्याराम कोठुळे यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या

सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संवाद साधून कुटुंबीयांना धीर देत घाबरू नका, शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

   वाळकी येथे गावठाणातील पूल परिसरातील तसेच जुंदरे  मळा परीसरातील नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांकडून  झालेल्या नुकसानीची माहितीही त्यांनी घेतली.



वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

नुकसानीच्या पाहणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतांना म्हणाले, मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील पंचनामे तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या  इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे. ज्या गावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खराब झाले असतील त्या रस्त्यांची तसेच बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी. गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे.  ज्या ठिकाणी रोहित्र बदलण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी ती तातडीने बदलून  विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.

पशुधनासाठीच्या चाऱ्याचेही नुकसान झाल्याने इतर तालुक्यात उत्पादित केलेल्या चाऱ्याची वाहतूक करत नागरिकांच्या मागणीनुसार चारा उपलब्ध करून देण्यात यावा. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  

 ज्या गावांतील ओढे, नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे बदलला असेल त्या ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी ही अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी केले.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थ उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post