महापालिकेत लवकरच पदभरती; किती जागा भरणार पहा...



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :  महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने १३० पदांना खात्री लावत केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीसाठी पाठवलेला प्रस्ताव नाशिकहून मान्यतेसह महापालिकेला प्राप्त झाला आहे. आता महापालिका स्तरावर खेळाडू, दिव्यांग अशा समांतर आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.


महापालिकेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महानगरपालिकेने १३४ तांत्रिक पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. पगाराचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढल्याने महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव तयार करून नाशिक येथे पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. आता समांतर आरक्षण निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू आहे. प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मान्यतेनंतर भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post