जन्म व मृत्यूच्या जुन्या नोंदीचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करण्याचे आदेश



आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुन्या महानगरपालिकेत रेकॉर्ड विभागाची केली पाहणी

जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी होणारा त्रास थांबून दाखले वेळेत मिळणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे 

माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर - महानगरपालिकेच्या जन्म व मृत्यू विभागाकडील जुन्या नोंदी अनेकवेळा सापडत नाहीत. जुने रेकॉर्ड शोधण्यासाठीही अडचणी येतात. परिणामी, नागरिकांना वेळेत दाखले देण्यात अडचणी येतात. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. हा त्रास थांबण्यासाठी जुन्या नोंदीचे डिजिटलायझेशन करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत. तसेच, रेकॉर्ड विभागातील जन्म व मृत्यू नोंदीसह इतर रेकॉर्डही स्कॅन करून घ्यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.


आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुन्या महानगरपालिकेतील रेकॉर्ड विभागाची पाहणी केली. तेथील रेकॉर्ड अत्यंत जुने असून काही कागदपत्रे काळानुरूप जीर्ण होत आहेत. या रेकॉर्डचे तसेच, जन्म व मृत्यूच्या नोंदी असलेल्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करणे गरजेचे आहे. जन्म व मृत्यूच्या जुन्या नोंदी वेळेत न सापडल्यास नागरिकांना वेळेत दाखले देता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक कायदेशीर प्रकरणांमध्येही जुने रेकॉर्ड शोधावे लागते. त्यामुळे या रेकॉर्डचे जतन करणे आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, असे निर्देश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर उपस्थित होते.


आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, जन्म व मृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. सर्व प्रभाग कार्यालयात त्या त्या हद्दीतील दाखले मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जुन्या नोंदी शोधण्यात अडचणी येत असल्याने या नोंदीच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्यात येऊन डिजिटलायझेशन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून नागरिकांना होणारा त्रास वाचून, दाखले वेळेत मिळतील, असा विश्वासही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post