धक्कादायक प्रकार! डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर



माय नगर वेब टीम 

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारासाठी नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शासकीय रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात (Pundliknagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असताना, डॉक्टरांनी (Doctor) त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला 20 एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी बाळाला फायमोसीस विथ पिनाईल टॉर्नन हा आजार झाल्याचे सांगून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 25 एप्रिलला बाळाला ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी 20 ते 25 मिनिटात ऑपरेशन होईल, असे सांगितले होते. मात्र 45 मिनिटं होऊन देखील ऑपरेशन झाले नव्हते. तासाभराने डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन चांगलं झाल्याची माहिती चिमुकल्याच्या कुटुंबियांना दिली. एका डॉक्टरांनी बाळाला स्पाईनमध्ये भूल दिली होती. परंतू बाळाने मध्येच हात हलविल्यामुळे त्याला पुन्हा झोपेचे इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे बाळ सध्या बेशुद्ध असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यानंतर 6 मेपर्यंत त्याच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू होते. 6 मे रोजी त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

6 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल 

आता याप्रकरणी शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळ, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आमि डॉ. नितीन अधाने यांचा समावेश आहे.  चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असताना डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे उघड झाले आहे. 

पोलीस उपायुक्तांची प्रतिक्रिया

दरम्यान, बाळाच्या कुटुंबीयांकडून एप्रिल महिन्यात तक्रार आली होती, त्यांनी रुग्णालयावर आरोप केले होते. त्यांना आम्ही कायदेशीर तक्रार करण्यासाठी सांगितले. त्यांच्या तक्रारीनंतर सर्व कागदपत्रे आम्ही शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यांनी दिलेल्या अहवालनुसार आम्ही 6 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्याबाबत पुढील तपासानुसार निर्णय घेण्यात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवणीत कावत यांनी दिली आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post