माय नगर वेब टीम
मुंबई : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला.
देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णान्न आहे. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.
राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली.
Post a Comment