रात्रीतून आरोपीला पोलिसांनी सिव्हील मधून पळवून नेत व्हाया पारनेर ग्रामीण रुग्णालयातून पारनेर सबजेलला केले दाखल
माय नगर वेब टीम
अहमदनगर : नगरचे सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेला भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते किरण काळे यांनी भांडाफोड करीत उजेडात आणला. भाजप आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट सिव्हील हॉस्पिटल गाठले. कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.
याची कुणकुण लागतातच ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी खाजगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटांत आरोपी औटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला. ही ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. पाटीलला पुण्याच्या ससून शासकीय रुग्णातून पोलिसांनीच पळवून लावल्याचा आरोप आहे. तशाच पद्धतीने औटीला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव होता, असा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला. मात्र आम्ही सतर्कता दाखवल्यामुळे पोलिसांचा इरादा कार्यसिद्धीस जाऊ शकला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह मविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच किरण काळे यांनी ड्युटीवर असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काळे म्हणाले की, आम्ही आधी ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना आरोपीला आलिशान सुविधा का दिला जात आहेत ? बिर्याणीने त्याचा पाहुणचार का केला जात आहे ? त्याला फोन कोण पुरवत आहे ? तो मोबाईल वरून कोणाशी संपर्क साधत आहे ? आरोपी औटी मोबाईलवरून रुग्णालयात असताना देखील बोलत असल्याचा फोटोच त्यांनी पुरावा म्हणून दाखवला. मात्र या सर्व गोष्टींवर कोणती ही उत्तरं सीएमओ देऊ शकले नाहीत. त्यांची बोबडी वळाली.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माहिती देण्यामध्ये मोठी विसंगती :
आरोपी औटी कुठे आहे ? याची विचारणा किरण काळे यांनी केली असता सिव्हिल सीएमओ यांनी सांगितले की सकाळी नऊ वाजताच आम्ही त्याला डिस्चार्ज दिला आहे. त्यानंतर त्यांना आम्ही आरएमओ यांच्याशी संपर्क साधून आम्हाला योग्य ती माहिती देण्याची मागणी केली असता त्यांनी सांगितले की सीएमओ आऊट ऑफ स्टेशन आहेत. त्यानंतर त्यांच्याच फोनवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.घोगरे यांनी काळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ.घोगरे यांनी सांगितले की आरोपीला आम्ही सकाळीच डिस्चार्ज दिला आहे. पण पोलिसांनी त्याला अजून येथून नेलेले नाही. ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे म्हणत हात झटकल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
त्यानंतर आरोपीला पोलिस आणि सिव्हिल प्रशासनाच्या मदतीने मागच्या दाराने खाजगी गाड्यांमधून पळवून नेले जात असल्याची माहिती काळे यांना समजली. काळे यांनी सीएमओ यांच्याकडे आरोपी औटीला ठेवण्यात आलेल्या वॉर्ड मध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाहणी करू द्या. आम्ही शांततेत पाहणी करू. मात्र गुन्हेगारांना होत असलेली प्रशासनाची मदत ही निंदनीय आहे. आम्हाला सत्य काय आहे ते दाखवा. यासाठी आग्रह धरला. त्यानंतर सीएमओ, तिथे उपस्थित असणारे तोफखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी, रुग्णालयाचे सुरक्षारक्षक, कर्मचारी व कार्यकर्ते यांच्यासह काळे यांनी सीएमओ यांच्या समवेत जाऊन स्वतः पाहणी केली असता ज्या विभागात आरोपी औटीला ठेवण्यात आले होते तेथून काही मिनिटांपूर्वीच पोलिसांनी त्याला खाजगी वाहनातून पळवून नेल्याचे समोर आले.
यावेळी काळे यांच्या फेसबुक वॉल वरून लाईव्ह प्रकाशन देखील सुरू होते. काळे यांनी यावेळी ड्युटीवर असणाऱ्या सदर वॉर्ड मधील महिला कर्मचाऱ्यास आरोपी औटी कुठे आहे ? अशी विचारणा केली असता सदर कर्मचाऱ्याने सांगितले की आठ वाजून तेरा मिनिटांनी आरोपीला डिस्चार्ज दिला आहे. हा वॉर्ड कोणता आहे ? विचारले असता, हा वॉर्ड ऑर्थोपेडिक असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर मात्र काळेंनी तीव्र संताप व्यक्त केला. काळे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारी सिव्हील रुग्णालयाची आरोपी औटीची कागदपत्रे त्यांना दाखवली. त्यामध्ये आरोपीला ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल केल्याची नोंद आहे.
काळे यांनी प्रश्नांची सरबत्ती करताना प्रशासन अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुनावले की तुम्ही ट्रॉमा वॉर्ड मध्ये आरोपीला दाखल केल्याची नोंद करता. प्रत्यक्षात अशा आरोपींसाठी वेगळ्या वॉर्डची सुविधा आहे. तसे असताना देखील आरोपीला ऑर्थोपेडिक वॉर्ड मध्ये का ठेवले ? त्याची तक्रार ही तीव्र पोट दुखीची होती. असे असताना त्याला विशेष रूम का देण्यात आली ? पोट दुखीवर ऑर्थोपेडिक विभाग काय उपचार करत होते ? दोन ऑगस्ट रोजी आरोपीला या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र तीन ऑगस्टला केलेल्या सोनोग्राफी, बायोकेमिस्ट्री आणि अन्य रिपोर्ट मध्ये सर्व काही ठीक असून पोटाचा कोणताही आजार नसल्याचे त्यामध्ये मेडिकली निदान सिव्हील रुग्णालयानेच केले आहे. त्यावर पाच ऑगस्टला स्वतः आरोपीनी लिखित दिले आहे की मी कोणतेही औषधे घेणार नाही.
जर आरोपी गंभीर पोट दुखी साठी दाखल झाला होता तर तो औषधे का घेत नव्हता ? जर औषधे घेत नव्हता तर त्याला सिव्हील रुग्णालयात कशासाठी ठेवले होते ? या कोणत्याच प्रश्नांची उत्तरे ड्युटीवर असणारे प्रशासन देऊ शकले नाही.
ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती :
किरण काळे यांनी यावेळी पुण्यातील कुप्रसिद्ध ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात झाली असल्याचा गंभीर आरोप केला. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केले. जिल्हा शासकीय रुग्णालय, ड्युटीवरचे पोलीस कर्मचारी, जेल प्रशासन यांच्या संगनमतातून राज्यात केवळ भाजपची सत्ता आहे, गृह खातं त्यांच्याकडे आहे, आरोपी औटीला मोठा राजकीय वरदहस्त आहे म्हणून त्याची आलिशान, शाही बडदास्त ठेवली जात होती. ललित पाटील देखील अशाच पद्धतीने पुण्यात ससून रुग्णालयात आलिशान सुविधा अनुभवत होता. शेवटी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला. नव्हे त्याला पळून जाण्यासाठी गृह विभागानेच मदत केली.
रात्रीतून व्हाया पारनेर ग्रामीण रुग्णालयात ते सबजेल प्रवास :
किरण काळे मविआ कार्यकर्त्यांसह सिव्हीलमध्ये दाखल झाल्याचे कळताच पडद्यामागून सूत्रे वेगवान हलली. आलिशान, महागड्या खाजगी गाड्या रुग्णालयात बोलविल्या गेल्या. मागच्या दाराने भाजप कार्यकर्ता आरोपी औटीला पोलिसांनी गाडीत घातले. समोर यावेळी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मविआचे ठिय्या आंदोलन सुरू होते. पुढे आंदोलन सुरू असतानाच प्रशासनाने संगनमत करत त्याला सिव्हिलमधून बाहेर काढले. स्वतः ड्युटीवरच्या महिला कर्मचाऱ्यांनी आठ वाजून तेरा मिनिटांनी तो इथून बाहेर पडल्याची कबुली फेसबुक लाईव्ह चालू असताना दिली. त्यानंतर काहीच वेळात रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आरोपी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला ऍडमिट करून घेतले गेले नाही. त्याने तिथे देखील आपले पोट दुखत असल्याचे तक्रार केली. शेवटी त्याला पोलिसांनी पारनेरच्या सबजेलमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल केले.
आरोपीला पळवून लावण्याचा इरादा होता :
काळे यांनी ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यां बाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल मधून रात्रीतून पळून नेलेल्या आरोपी औटीला पोलिसांनी छोट्या ग्रामीण रुग्णालयात का नेले ? जिल्हा शासकीय रुग्णालय हे त्याहीपेक्षा मोठे आणि अद्यावत असताना तिथली ट्रीटमेंट सोडून छोट्या ग्रामीण रुग्णालयात का नेले ? तेथे आरोपीला नेत असताना रात्रीच्या अंधारात ते ही खाजगी वाहनातून प्रवास पोलीस कर्मचाऱ्यांनी का केला ? एवढी कोणती तातडी होती की रात्री आंदोलक आले आहेत म्हणून पोलिसांनी त्याला सिव्हिलमधून बाहेर काढले ? रात्रीच्या अंधारात त्याला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचा इरादा होता काय ? ललित पाटील ड्रग्स माफिया प्रमाणे आरोपी भाजप कार्यकर्ता औटीला देखील पोलिसांना पळवून लावायचे होते. मात्र मविआच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा इरादा फसल्याचा दावा यावेळी किरण काळे यांनी केला.
औटीवर हा गंभीर गुन्हा :
भाजप कार्यकर्ता आरोपी विजय सदाशिव औटी याच्यावर पारनेर नगरपंचायतीची बनावट दस्तऐवज, महसूल विभागाचे बनावट सातबारा बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा प्रशासनाच्या चौकशी अंतिम सिद्ध झाल्यानंतर पारनेर मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला आहे. महसूल विभागाची बनावट कागदपत्र बनविणे हा गंभीर गुन्हा आहे. सरकारमधील अनेक बडे नेते त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे.
आरोपी होता प्रचारात सक्रिय :
विजय औटी हा पारनेरचा माजी नगराध्यक्ष आहे. तो लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय होता.
तहसीलदारांच्या आदेशानेच आरोपी रुग्णालयात :
दरम्यान, याबाबत पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सांगितले आहे की न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी विजय औटीला रुग्णालयात दाखल करण्याबाबत तहसीलदारांचे ३१ जुलैला पत्र प्राप्त झाले होते. या संदर्भात ठाणे अंमलदारांनी तहसीलदारांना फोन करून खात्री केली. त्यानंतरच औटीला पारनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्ह्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथून त्याला मंगळवारी रात्री पुन्हा पारनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथून त्याला कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
तहसीलदार म्हणतात माझा संबंध नाही :
याबाबत पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौदाणे यांच्याशी संपर्क केला असता तहसीलदारांचा आरोपीशी कोणत्याही संबंध नसतो. हे काम पोलिसांचे असून याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रांची मागणी :
दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा शल्य चिकित्सकांशी फोनवर बोलणे झाल्यानंतर मविआने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी ड्युटीवर असणाऱ्या सीएमओ यांना भाजप कार्यकर्ता आरोपी औटीला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या क्षणापासून ते ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेपर्यंतचे सर्व संबंधित विभागांचे तसेच लॉबी आणि एन्ट्री, एक्झिट गेटचे सीसीटीव्ही फुटेज, तसेच प्रशासकीय कामकाज आणि वैद्यकीय उपचार व तपासण्यांची कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.
चौकशीची मागणी :
याबाबत महाविकास आघाडीने, जिल्हा शासकीय रुग्णालय, ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी, पारनेर तहसीलदार, पारनेर सबजेल प्रशासन यांच्या संगनमतातून भाजप प्रणित सरकार कडून आरोपीला दिल्या गेलेल्या या आलिशान शाही, बढधास्तीच्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले.
या सगळ्याच्या पाठीशी भाजप, हीच का यांची लाडकी बहीण योजना ? :
देशात, राज्यात भाजपचे सरकार आहे. गृहमंत्री हे भाजपचे असून ते भाजप पक्षाचे नगर जिल्ह्याचे प्रभारी देखील आहेत. त्यामुळे प्रशासनावर त्यांचा विशेष दबाव आहे. पुण्यातल्या ड्रग माफिया ललित पाटीलला देखील अशाच प्रकारची अलिशात सुविधा पुरविली जात होती. आरोपी औटीला या सगळ्या सुविधा देण्यासाठी सरकारमधील कोणत्या बड्या नेत्यांनी मदत केली ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आत्ता काही दिवसांपूर्वीच मलकापूर मध्ये गृहमंत्र्यांचा कार्यकर्ता असणाऱ्या मलकापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतीने पोलीस स्टेशन मध्येच महिला भगिनीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हीच का यांची लाडकी बहीण योजना ? गुन्हेगारांना मदत, महिलांना कार्यकर्त्यांकडून मारहाण हाच भाजपचा खरा चेहरा आहे. त्याचा बुरखा काँग्रेस फाडल्याशिवाय राहणार नसल्याचे यावेळी किरण काळे म्हणाले.
कार्यकर्त्यांनी बजावली स्वयंसेवकांची भूमिका :
कॅज्युलटी सुरू असताना रुग्णालय कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या मागे असणारे स्ट्रेचर हवे होते. यावेळी किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की कर्मचाऱ्यांना मदत करा. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी सगळ्यांनी घ्या. यावेळी काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला मदत करत स्वयंसेवकांचे कर्तव्य बजावले. रुग्णालय असल्यामुळे यावेळी रुग्णांची गैरसोय होणार नाही याची मविआ कार्यकर्त्यांनी खबरदारी घेत कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत ठिय्या दिला.
Post a Comment