हॉटेलच्या यश पॅलेसच्या व्यवस्थापकाला धमकी; उद्योजक सचिन कोतकरसह 11 जणांवर गुन्हा..



माय नगर वेब टीम 

अहमदनगर - सक्कर चौकातील यश पॅलेस हॉटेलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करुन तू यश पॅलेस येथे काम करु नकोस, तू येथून कोठेही जा, अशी दमदाटी केल्याची व तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सचिन कोतकर यांच्यासह अकरा जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेशकुमार रामनारायण सिंग (वय ४५ रा. नंदकिशोर रेसिडेन्सी, वडगाव गुप्ता रोड, नागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग हे २०२० पर्यंत उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होतो. सन २०२१ मध्ये ते यश पॅलेस येथे नोकरीस लागले. तेव्हापासून उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन कोतकर हे त्यांना तू आमच्या समोर हॉटेल यश पॅलेस येथे काम करु नकोस, तू इतर कोठेही काम कर असे म्हणत दमदाटी करत होते. त्याबाबत त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर यश पॅलेस येथील कर्मचारी पिंटू विनोद सिंग याला हॉटेल उदयनराजे पॅलेस येथील रोशन कुमार मिश्रा व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. त्यावेळीही पिंटू विनोद सिंग याने तक्रार दिली होती. 

सचिन कोतकर हे वेळोवेळी उदयनराजे पॅलेस येथील सुरज आप्पासाहेब शेळके, गणेश पांडुरंग सातपुते, सचिन पांडुरंग सातपुते यांना पाठवत होते व तू यश पॅलेस हॉटेलला काम करु नकोस असे सांगत होते. सोमवारी मध्यरात्री उदयनराजे पॅलेस येथील प्रिन्स याने फोन केला व त्यावरील शिवीगाळ केली. त्यानंतर घरी जात असतांना सचिन कोतकर यांच्या सांगण्यावरून रोशनकुमार मिश्रा उर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग, निरज कुमार, अमन श्रीकांत सिंग, सुनिल कुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर व ४-५ अनोळखी व्यक्तींनी दमदाटी करत तुला नगरमध्ये राहू देणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post