मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळू नका; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, त्यांना उमेदवारी दिल्यास...



माय अहमदनगर वेब टीम 

नाशिक : ‘मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला डिवचण्याचे किंवा जखमेवर मीठ चोळण्याचे काम महायुतीने करू नये. भुजबळांना उमेदवारी देऊ नका. अन्यथा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी नाशिकमधून दिला.


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल असे निश्चित मानले जात आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास भुजबळ यांनी विरोध केल्याने मराठ्यांमध्ये रोष आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषद घेतली.


महायुतीने भुजबळांना उमेदवारी देऊन स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन गायकर यांनी केले. ‘आम्ही पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या उमेदवारीला विरोध केलेला नाही. परंतु, मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळांना आमचा विरोध आहे. महायुतीमधील शिवसेनेसारखे घटकपक्षही त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भुजबळ दोन अडीच लाखांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे ते यंदा निवडून येतील असा जावईशोध महायुतीमधील कोणी लावला हे शोधायला हवे. भुजबळ स्वत: इच्छुक नसताना त्यांना घोड्यावर का बसविले जात आहे, असा सवालही गायकर यांनी उपस्थित केला.


महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली असून, त्यांनाच पाठिंबा का देत नाही, असा सवाल गायकर यांना करण्यात आला. वाजे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. तसा निर्णय कुणी एकजण घेऊ शकत नाही. भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास मराठा समाजाचे नेते एकत्र बसून योग्य निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य गायकर यांनी केले. भुजबळांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात मी उमेदवारी करणार असा पुनरुच्चार त्यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post