आमदार निलेश लंके, साहेब की दादांचे? न्यायालयात खडाजंगी, कोण काय म्हणाले...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके नेमके कोणाचे?, यावरून सध्या तरी राजकीय आहे. शरद पवार आणि अजित पवार गट, यावरून तर्कवितर्क लढवत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचा?, हा वाद न्यायालयात सुरू असतानाच तिथे देखील दोन्ही पवार गटांच्या वकिलांमध्ये आमदार लंके कोणाचे? यावरून खडाजंगी झाली. यामुळे आता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. तसेच पुन्हा लंके यांनी शरद पवार यांची पुन्हा भेट घेतल्याने संभ्रम आणखीनच वाढला आहे. आ. लंके यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढे काय होते हे पहावे लागणार आहे. 


राष्ट्रवादीच्या शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांमध्ये पक्ष चिन्हावरून वाद आहेत. शरद पवार गटाला 'तुतारी' व अजित पवार गटाला 'घड्याळ' चिन्ह दिले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


या याचिकेच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले 'तुतारी' हे चिन्ह लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीसाठीही वापरता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे 'घड्याळ' हे मूळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे असले, तरी ते वापरताना प्रत्येक ठिकाणी चिन्हाबाबतचे निर्णय येईपर्यंत 'अटी आणि शर्ती'नुसार, असे लिहिण्याचे निर्देशही न्यायालयाने अजितदादांना दिले आहेत.


यापार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यामुळे दोन्ही पवारांच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. अजितदादांसोबत असलेले आमदार लंके हे शरद पवारांचा फोटो वापरत असल्याचे शरद पवार यांचे वकील सिंघवी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर, आमदार लंके अगोदरच पवारांच्या गटात गेल्याचा दावा अजितदादांच्या वकिलांनी केला.


वकील सिंघवी यांनी तो नाकारला आणि आमदार लंके केवळ एका कार्यक्रमापुरते आले होते. पण अधिकृतपणे आजही ते अजितदादा यांच्याकडेच आहेत, असे न्यायालयाला सांगितले. एकूणच, शरद पवार आणि अजित पवारांच्या वकिलांत आमदार लंकेंसह इतर काही मुद्यांवरून न्यायालयात खडाजंगी झाल्याच्या चर्चांना उधाण आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post