अजितदादांचा इशारा, आमदार लंके सावध, मोठ्या साहेबांचा पाठिंबा, पहा नेमकं काय घडतंय...माय अहमदनगर वेब टीम 

पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून लोकसभेचे मैदानही गरमागरमी सुरु झाली आहे. भाजपने खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी पुन्हा जाहीर करून टाकली आहे. तर विरोधी उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. असे असले तरी विखे यांच्या विरोधात आमदार निलेश लंके हेच उमेदवार असतील, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा  भेट घेतली. जर लोकसभा निवडणूक लढवायची झाली तर पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल नाहीतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, याची जाणीव आ. निलेश लंके यांना आहे. याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.


महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत नगर दक्षिणच्या जागेवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच अंतिम निर्णय झाला असल्याचे सांगितले जातं आहे  


महाविकास आघाडीकडून निलेश लंके उमेदवार असतील असे संकेत अनेक दिवसांपासून मिळत आहेत. लंके यांनी त्या दृष्टीने बरीच पावले पुढे टाकली आहेत. मात्र, त्यांनी किंवा पक्षानेही अजून पर्यंत तरी अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र काहीही करून येत्या दोन दिवसांत लंके यांना किंवा शरद पवार गटाला उमेदवारीसंदर्भात निर्णय जाहीर करावा लागणार आहे.


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके यांनी मतदारसंघातील विकासासाठी निधीची आवश्यकता लक्षात घेऊन अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु अजित पवार यांच्या गटात जाताना लोकसभा निवडणुकीची इच्छा त्यांच्या मनात होतीच. परंतु नगर दक्षिणची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने विद्यमान खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली. त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकण्यासाठी निलेश लंके शरदचंद्र पवार गटात प्रवेश करू इच्छितात. मात्र जर पक्षांतर करायचे झाले तर त्यांना प्रथमत: आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल नाहीतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, अशी भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवल्याने यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.


बैठकीत अंतिम निर्णय झाला असून लोकसभेला आमदार निलेश लंके की राणीताई लंके यांचा फैसला लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post