मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली; मराठा समाज आक्रमक, मुख्यमंत्री म्हणाले...



माय नगर वेब टीम 

जालना  -मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच तातडीनं अधिवेशन घेऊन त्यात कायदा पारित करावा अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. १० फेब्रुवारीपासून जरांगे उपोषणाला बसलेले असून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. 


सलग ७ दिवस उपोषण सुरू असल्याने मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारविरोधात रोष व्यक्त करीत आहेत. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाहीर पत्रकारपरिषद घेणार आहेत.


या पत्रकारपरिषदेत ते नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा बनवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. सध्या सरकारने अधिवेशनाची तारीख २२ फेब्रुवारी ठरवली आहे. 


मात्र, मनोज जरांगेंचं आंदोलन आणि मराठा समाजाचा रोष पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २२ फेब्रुवारीच्या आधीच विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करू शकतात. यासोबतच मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाबाबत नेमका काय अहवाल दिला, याबाबतची माहिती पत्रकारपरिषदेत देऊ शकतात.


दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सातव्या दिवशी आपलं उपोषण सुरू ठेवलं असलं, तरी कोर्टाच्या आदेशानंतर उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. विशेष बाब म्हणजे गुरुवारी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी १ वाजता जरांगे जाहीर पत्रकारपरिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post