युवा महाराष्ट्र केसरीची उपमहाराष्ट्र केसरीवर मात; सारोळा कासारच्या आखाड्यात कुस्त्यांच्या थरार



राज्यभरातील १५० नामांकित मल्लांनी हजेरी ; 

माय नगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे निर्गुणशहावली बाबा यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या मैदानात राज्यभरातील १५० नामांकित मल्लांनी हजेरी लावली. आखाड्यात तब्बल ७ तास  लक्षवेधी कुस्त्यांच्या थरार रंगला. त्यामुळे उपस्थित कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. शेवटची २ लाख ११ हजार रुपये इनामाच्या मानाच्या कुस्तीत युवा महाराष्ट्र केसरी विष्णु खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला अस्मान दाखविले. 

सारोळा कासार येथील ३ दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाची सोमवारी (दि.२७) कुस्त्याच्या आखाड्याने सांगता झाली. यावर्षी प्रथमच पारंपारिक आखाड्याऐवजी गावकर्‍यांनी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते. यामध्ये विविध वजन गटात एकूण ७५ कुस्त्या झाल्या. मानाची २ लाख ११ हजाराची कुस्ती गावातील युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला आस्मान दाखवत जिंकली. दुसरी ७५ हजार इनामाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन अनिल ब्राह्मणे याने सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूर याच्यावर मात करत जिंकली. महाराष्ट्र चॅम्पियन अनिल लोणारी सुरेश पालवे तसेच मनोज फुले व ऋषी लांडे या दोन कुस्त्या बरोबरीत सुटल्या. पाचवी मानाची कुस्ती पुण्याच्या सागर कोल्हे याने काष्टीच्या अण्णा गायकवाड याच्यावर मात करत जिंकली. 

याशिवाय सारोळा कासार येथील जय बजरंग तालीम येथील भूषण साळवे, साईराज कुसेकर, हर्षवर्धन कुसेकर, शुभम पुंड, यश हारदे, ऋतू कडूस, आश्फाक शेख, जितू साळवे, निखील जाधव, ओम बोरुडे, संस्कार भोसले, या मल्लांनीही चमकदार कामगिरी करत कुस्त्या चितपट करुन उपस्थितांची मने जिंकली. या मल्लांना युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे यांचे मार्गदर्शन लाभले. कुस्त्यांच्या मैदानात पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, बलभीम शेळके, पारनेर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे युवराज पठारे, सुभेदार शंकर खोसे तसेच गावातील राजाराम धामणे, दत्तात्रय कडूस, बापू काळे, बब्बू इनामदार यांनी काम पाहिले. कुस्त्यांच्या थराराचे समालोचन पुणे येथील अक्षय मुळीक यांनी केले. आखाड्याचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस, शिक्षक नेते संजय धामणे, बाजार समितीचे सहाय्यक सचिव संजय काळे यांनी केले.

या मैदानी कुस्त्यांच्या नियोजनासाठी रवि कडूस, मच्छिंद्र काळे, फकीरतात्या कडूस, बबन तांबोळी, सुभाष धामणे, उत्तम कडूस, डॉ. श्रीकांत देशपांडे, सुरेश धामणे, जयप्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, गावातील प्रमुख कारभारी यांनी परिश्रम घेतले. 

दुपारी ३ वाजता सुरू झालेले कुस्त्यांचे मैदान रात्री १० वाजता संपले. तब्बल ७ तास चाललेल्या या कुस्त्यांसाठी गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून १ हजारापासून ते १ लाख ११ हजारापर्यंत इनाम विजेत्या मल्लांना दिले. याशिवाय गावातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या भूमीपुत्रांचा सन्मान करण्यात आला.

निवडणुक झाली राजकारण संपले...

सारोळा कासार गावची ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच होऊन गेलेली आहे. या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस व सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय काळे या दोघांच्या पत्नींची सरपंच पदासाठी समोरासमोर लढत झाली होती. कृषी पदवीधर संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा मंगलताई कडूस या ही निवडणुक रिंगणात होत्या. निवडणूक काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे रवींद्र कडूस, संजय काळे, शिक्षक नेते संजय धामणे, माजी उपसरपंच जयप्रकाश पाटील, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ काळे, संचालक राजाराम धामणे, कृषी पदवीधर संघटनेचे महेश कडूस, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड यांनी सर्वांनी एकत्र येत निवडणुक झाली राजकारण संपले असे म्हणत गावच्या वार्षिक यात्रोत्सव व कुस्ती मैदानाचे नियोजन केल्याने तब्बल ७ तास कुस्ती मैदान रंगले. यातून सारोळा कासार गावचा असलेला लौकिक कायम असल्याचे उपस्थितांना दिसून आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post