अन्नातून विषबाधा; एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर -  तालुक्यातील टाकळी काझी येथील एका शेतकरी कुटूंबातील तीघा मुलांना घरच्याच खाण्यातुन विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी घडली असुन यातील दोघा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकावर नगरच्या खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

घरी करुन ठेवलेल्या संत्र्याचा ज्युस किंवा मांसाहारी पदार्थातुन ही विषबाधा झाल्याची चर्चा आहे. मयत मुलाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन त्याचा अहवाल येणे बाकी आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी, टाकळी येथे बापू साहेबराव म्हस्के व भाउसाहेब साहेबराव म्हस्के या दोघांचे एकत्रित कुटूंब आहे. यातील बापू हे गवंडी काम करतात तर भाउसाहेब हे चालक म्हणुन काम करतात. त्यांच्या घरातील फ्रिजमध्ये बुधवारी संत्र्याचा ज्युस करुन ठेवलेला होता. हा रस शिवराज बापू म्हस्के वय साडेचार वर्षे, स्वराज बापू म्हस्के वय दीड वर्षे, तसेच सार्थक भाउसाहेब म्हस्के वय (१४ वर्षे) यांच्या पिण्यात आला. त्यांनी आदल्या दिवशी मटन खाल्ले असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. नेमकी विषबाधा कशाने याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. गुरुवारी सकाळी या मुलांना त्रास सुरु झाला. त्यांना हॉस्पीटलमध्ये नेत असताना स्वराज म्हस्के याचा रस्त्यातच मृत्यू झाला तर शिवराज म्हस्के याच्यावर उपचार सुरु असताना निधन झाले. सध्या सार्थक म्हस्के याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजते. बापू साहेबराव म्हस्के यांना शिवराज आणि स्वराज ही दोनच मुले होती पण या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post