माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास जेऊर गटातील युवा नेते गणेश आवारे यांनी व्यक्त केला आहे.
आशिया खंडातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. निर्णायक बहुमत नसताना देखील अनपेक्षित पणे कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने जेऊर गटात जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कर्डिले समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
युवा नेते गणेश आवारे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गणेश आवारे यांनी सांगितले की, सर्वसामान्य शेतकऱ्यांची, बचत गटांच्या समस्यांची जाण असणारे नेतृत्व जिल्हा बँकेला लाभले आहे. त्यांच्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे शेतकरी वर्गात देखील समाधान पसरले आहे.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनीच जिल्हा बँक ही कारखानदारांची बँक असलेली ओळख पुसून शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास गणेश आवारे यांनी व्यक्त केला.
__________________________
कर्डिले हेच शेतकऱ्यांचे वाली...
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक असताना कर्डिले यांनी शेतकऱ्यांना खेळते भांडवल म्हणून कर्ज दिले होते. खऱ्या अर्थाने कर्डिले हेच शेतकऱ्यांचे वाली आहेत.
...... गणेश आवारे (अध्यक्ष गणेश आवारे युवा प्रतिष्ठान)
________________________
Post a Comment