दिगदर्शक महेश काळे लिखित ‘टर्री’ 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला / प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
माय नगर वेब टीम -
राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे नवा चित्रपट घेऊन येत आहे. महेश लिखित आणि दिग्दर्शित ‘टर्री’ हा नवाकोरा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच ‘टर्री’चे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलेय. यामधून आपल्याला अफलातून अनुभव पाहावयास नक्की मिळणार असल्याचे संकेत मिळताहेत. या सिनेमात ललित प्रभाकर प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे टीझरही लवकरच येणार आहे. पोस्टर आल्यापासून चाहतेही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री' चे पोस्टर दिसत आहे. ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ललित वेगळ्या भुमिकेत दिसत आहे. ललितचा राउडी अवतार नक्कीच भावणार आहे. यामध्ये ॲक्शन, ड्रामा, प्रेमाचा तडका चित्रपटामध्ये पाहावयास मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती प्रतिक किशोर चव्हाण आणि अक्षय आढळराव पाटील यांनी केली आहे तर पॅनोरमा स्टुडिओ सिनेमा प्रदर्शित करत आहे.
अहमदनगरमधील मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेत असताना महेश काळे यांच्या ‘रूपया’ लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर महेशने मागे वळून मागे पाहिले नाही. पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) महेश काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ने पटकावला. राज्य शासनाच्या पुरस्कारावरही ‘घुमा’ ने मोहोर उमटवली होती. असे अनेक पुरस्कार ‘घुमा’ने पटकावले तर २० पेक्षा अधिक चित्रपट महोत्सवात घुमाला नामांकन मिळाले होते.
‘घुमा’ ला मिळालेल्या पुरस्काररुपी यशानंतर महेशने चित्रपट क्षेत्रात पुढची पावले टाकण्यास हार मानली नाही. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘घुमा’मुळे महेशला राज्यभर ओळख मिळाली. यातून आता तो नवाकोरा मराठी चित्रपट ‘टर्री’ घेऊन येत आहे.
‘टर्री’ सिनेमामध्ये खूप काही नवीन आहे. ॲक्शन, ड्रामा, लव अस सबकुछ आहे. टर्री करणे माझ्यासाठी चॅलेजिंग होते. ‘टर्री’ सिनेमा नक्कीच सर्वांना आवडेल.
– महेश काळे, लेखक- दिग्दर्शक, टर्री
Post a Comment