उधारीचे पैसे मागितल्याने चौघांकडून कोयत्याने हल्लामाय नगर वेब टीम 

 अहमदनगर - उधारीच्या रकमेची मागणी करणार्‍या व्यावसायिक तरूणावर चौघांनी कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सागर एकनाथ अवसरे (वय 26 रा. रेणविकर कॉलनी, निर्मलनगर, सावेडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तपोवन रोडवर ही घटना घडली.

जखमी अवसरे यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जाधव, साहिल शिंदे, शरद फुलारी, विशाल शिंदे (सर्व रा. तपोवन रोड, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सागर अवसरे यांचे तपोवन रोडवरील दोस्ती हॉटेलशेजारी सागर चिकन शॉप आहे. ते 7 नोव्हेंबर रोजी सकाळी शॉपवर असताना आकाश व साहिल चिकन घेण्यासाठी आले. त्यांनी उधार चिकन देण्याची मागणी केली असता सागरने त्यांना मागील उधारी 750 रूपये देण्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर सायंकाळी शरद व विशाल तेथे आले. त्यांनी आकाश व साहिल सोबत झालेल्या वादावरून सागर यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

चौघांच्या मारहाणीत सागर अवसरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post