ग्रामपंचायत सदस्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..... जेऊरची ग्रामसभा ठरली वादळी ; ग्रामस्थांचाही आक्रोश

  माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामसभा शुक्रवार दि. २६ रोजी संपन्न झाली. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तसेच ग्रामस्थांनी ही विविध कामांंबाबत आक्रोश व्यक्त केल्याने ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली.

     कोरोना नंतर प्रथमच कोरम पूर्ण होत जेऊरची ग्रामसभा सरपंच सौ. राजश्री मगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दीड वर्षांपूर्वी झालेल्या ढगफुटीने गावातील  अनेक पुल, रस्ते वाहून गेले होते. त्यावेळी पुलावर व रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आला होता. सदर मुरमाचे बिल मिळावे अशी मागणी रामदास म्हस्के यांनी केली. त्यावर सरपंच राजश्री मगर यांनी ग्रामपंचायत सदस्यच बिल काढण्यास विरोध करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. ग्रामपंचायत सदस्यांची बदनामी न करता कोणी विरोध केला ते जाहीर करण्यास सांगितले. त्याचवेळी इतर ग्रामपंचायत सदस्यांनी देखील ग्रामपंचायत सदस्यांची बदनामी थांबवावी व ज्यांनी विरोध केला त्यांचे नावे ग्रामसभेत जाहीर करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनेश बेल्हेकर व सरपंच पती अण्णासाहेब मगर यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

     जेऊर ग्रामपंचायत मध्ये  सदस्यांमध्येच एक सूत्रता नसल्याचे तसेच अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा नेहमीच होत होती. आजच्या ग्रामसभेमध्ये या गोष्टीला पुष्टी मिळाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत सदस्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने ग्रामस्थ देखील अवाक झाले. ग्रामसभेमध्ये लिगाडे वस्ती रस्ता, गुंजाळ वाट, प्राथमिक शाळेचे काम, पाणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

      तोडमलवाडी येथील नागरिकांनी आम्हाला पाणी मिळत नाही, रस्त्याचा प्रश्न याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. तोडमलवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी पाच नंबर प्रभागांमध्ये झालेल्या कामावरून चांगलीच खडाजंगी झाली. ग्रामपंचायत सदस्य शैलेश सदावर्ते यांनी सामंजस्याची भूमिका घेत तोडमलवाडी ग्रामस्थांना ग्रामपंचायतने केलेल्या प्रत्येक कामाचा हिशोब देऊ, असे आश्वासन देऊन शांत केले.

     वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले यांनी नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात येण्याचे आवाहन केले. जेऊर गावाला कायमस्वरूपी कृषी सहाय्यक नाही, कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नाही, पाणी वेळेवर येत नाही, वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांची झालेली दुर्दशा, ग्रामस्वच्छता, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मनमानी, आठवडे बाजारची जागा, अतिक्रमण या सर्वच मुद्द्यांवर वादळी चर्चा झाली. यावेळी विविध खात्याचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

_______________________________________

ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सुसूत्रता येणार का ?

जेऊर ग्रामपंचायत सदस्यांमध्ये गट पडल्याची चर्चा गावामध्ये होत असताना आजच्या ग्रामसभेत त्यांच्यातील अंतर्गत वादच चव्हाट्यावर आले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी एक सूत्रता ठेवून कुरघुडीचे राजकारण न करता गाव विकासाच्या दृष्टीने काम करण्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

___________________________________

 जेऊर गावचे राजकारण ह्या कोणत्या दिशेने भरकटत चालले आहे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना देखील उमजत नाही. गाव विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याने गाव विकासाला खीळ बसत आहे. ग्रामपंचायत सदस्यांमध्येच गट- तट असतील तर हे निश्चितच गाव विकासासाठी घातक असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.

_________________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post