जनावरांसाठी गायरान पण माणसांसाठी जागा नाही ही शोकांतिका- शिवाजीराव ढवळे पिंपळगाव माळवी येथे एकलव्य संघटना शाखेचे उद्घाटन

 माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका- आपल्याकडे ग्रामीण भागात जनावरांसाठी गायरान राखीव ठेवले जाते परंतु माणसांसाठी जागा नाही ही शोकांतिका असल्याचे मत एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी व्यक्त केले.

     नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तलावातील आदिवासी समाजाच्या वतीने रविवार दि. २८  रोजी एकलव्य शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना शिवाजीराव ढवळे यांनी आदिवासी समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जनावरांना चरण्यासाठी गायरान राखीव ठेवले जाते. परंतु येथे माणसांना राहायला जागा नाही ही शोकांतिका आहे. पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाच्या घरांनी पाणी शिरले आहे. येथील समाज जीव मुठीत धरून जगत असताना त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील आदिवासी समाजाची अशी परिस्थिती असणे हे दुर्दैव आहे.

      पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. समाज संघटित होत नाही, एकी दाखवत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. आदिवासी भिल्ल समाजाचा इतिहास बघता हा समाज लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो. आपण क्रांतिकारक माणसं आहोत पण राहतोत कुठे तर एखाद्या धरणाच्या, तळ्याच्या कडेला. आपली पुढची पिढी स्वाभिमानाने जगावी यासाठी गुलामी, लाचारीचे जीवन सोडून आपल्या प्रश्नासाठी संघटित होण्याची गरज आहे.

     शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आदिवासी भिल्ल समाज स्थलांतरित होत आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गहन आहे. एकलव्य संघटनेच्या साडेबारा हजार गावात शाखा असून एवढे सदस्य आहेत की आपण ठरवू त्याला आमदार, खासदार करण्याची ताकद आपल्यात आहे. आपण निवडून दिलेले आमदार इकडून तिकडे पळत आहेत. आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण एक लक्षात ठेवा आमचा अंत पाहू नका. अन आम्ही ठेवलेली हत्यारे आम्हाला परत बाहेर काढायला लावू नका. असा दणदणीत इशारा ढवळे यांनी दिला आहे.

     पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाच्या पुनर्वसनासाठी तसेच येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले. एकलव्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड यांनी शिवाजीराव ढवळे यांना पिंपळगाव तलावातील परिस्थिती तसेच येथील नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती देऊन संघटनेच्या मार्फत समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली.

     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, युवा तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, आकाश बर्डे, विकास गायकवाड, अर्जुन वाघ, करण वाघ, रोहित गायकवाड, आदित्य शिंदे यांच्यासह एकलव्य संघटनेचे पिंपळगावचे सर्व सदस्य व विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

_________________________________________

आदिवासी समाजावर आश्वासनांची खैरात

पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाकडे आजपर्यंत अनेक अधिकारी, पदाधिकारी यांनी भेटी दिल्या.  भेटीचे फोटो काढून बातम्या प्रसिद्ध करतात. आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे. परंतु आजपर्यंत प्रत्येक्षात काहीही मदत करण्यात आलेली नाही. आता आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.

.... आकाश गायकवाड ( युवा तालुकाध्यक्ष एकलव्य संघटना)

_____________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post