आमदार पडळकरांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज- सरपंच सौ. प्रियंका लामखडे आमदार निलेश लंके हे जनसामान्यांचे नेतृत्व

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका- आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारनेर तालुक्यात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर निंबळकच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी आमदार गोपीचंद पडळकरांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे.

     सरपंच प्रियंका लामखडे यांनी आमदार पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला. शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यावर टिका करण्या अगोदर स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमदार लंके यांचे कार्य संपूर्ण मतदारसंघाला माहिती आहे आणि ते जनतेमधून निवडून आमदार झालेले आहेत. मागील दाराने आमदार झालेले नाही. आमदार झाल्यापासून त्यांचे कार्य, त्यांनी केलेली विकास कामे, त्यांची लोकप्रियता संपूर्ण मतदार संघात फिरून पहावी. आमदार निलेश लंके हे त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण राज्याला परिचीत झालेले आहेत. त्यांच्याकडे राज्यातील उभरते नेतृत्व म्हणून पाहिले जाते. 

      कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य कोणत्या जाती धर्मापुरते मर्यादित नव्हते. कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना जीवदान दिलेले आहे. याची दखल राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाने घेतलेली आहे. अशा कर्तव्यदक्ष व जनसामान्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदार लंके यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार पडळकर यांना निश्चितच नाही. सर्वसामान्य कुटुंबातील लंके यांचा आमदारकीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. सदैव जनतेची सेवा करणारे लंके यांच्यावर मतदार संघच नाही तर संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांच्या कार्याचा आदर आहे.




     आमदार निलेश लंके हे कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या कार्यकर्तृत्वावर आमदार झालेले आहेत. आमदार झाल्यानंतरही त्यांनी कधीही जनसामान्यांशी असणारी नाळ तुटू दिली नाही. सतत जनतेत वावरून जनतेची कामे करणारा आमदार म्हणून लंके यांनी नावलौकिक मिळविला आहे. मतदार संघातील सर्वसामान्य नागरिक आमदार लंके यांच्या थेट संपर्कात आहेत. विकास कामे करताना राजकारण विरहित तसेच गट तट बाजूला ठेवून आमदार लंके यांच्याकडून विकास कामे सुरू आहेत. याची बहुदा पडळकर यांना माहिती नसावी. आपण ज्या व्यक्तीवर टीका करतो त्याच्याविषयी अगोदर संपूर्ण माहिती घ्यावी. विनाकारण टीका करायची म्हणून करू नका असा सल्लाही सौ. लामखडे यांनी दिला आहे.

     आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका पाहता त्यांचा राजकारणातील अभ्यास कमी असल्याचे दिसून येते. तसेच फक्त पोपटपंची करून राजकारणात यशस्वी होता येत नाही. त्यासाठी जनमानसात राहून लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. नाहीतर निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होते याचा अनुभव स्वतःला असताना जनमतातून निवडून आलेल्या आमदारांवर टीका करण्याचा कोणताच अधिकार पडळकर यांना नसल्याचे प्रियंका लामखडे यांनी सांगितले.

________________________________

 जाहीर माफी मागावी अन्यथा....

 आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व आमदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या टिके बद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना यापुढे जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नसल्याचा इशाराही सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी दिला आहे.

______________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post