असा झाला आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात; आमदार म्हणाले मी फक्त....

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.


‘नगरकर नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आपण भयंकर संकटातून सुखरूप बचावलो,’ अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली.


मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

दरम्यान, या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आमदार जगताप यांना ओळखणारे अन्य वाहनांतील नागरिकही मदतीसाठी थांबले होते. एवढ्या मोठ्या अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला गेले. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे भेटी गाठी आणि कामेही सुरू केली आहेत. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post