Third wave : नववर्षाच्या सुरुवातीलाच येणार तिसरी लाट?; कोविड सुपरमॉडेल पॅनलचा इशारा

 


ओमिक्रॉन व्हेरिएंटचा झपाट्याने होत असलेला प्रसार आणि वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात देशातील एकूण रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहोचली असून, रुग्णसंख्या वाढीचा वेग आणि परदेशातील परिस्थितीवरून कोविड सुपरमॉडेल पॅनलने तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनने डेल्टाला रिप्लेस करण्यास सुरूवात केल्यानंतर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे, असं राष्ट्रीय कोविड सुपरमॉडेल पॅनलचे सदस्य विद्यासागर यांनी म्हटलं आहे.


"नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. देशातील बहुसंख्य लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असल्याने दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असायला हवी आहे, पण तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. देशात सध्या दिवसाला 7,500 रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, डेल्टाला रिप्लेस करण्यास ओमिक्रॉनने सुरूवात केल्यानंतर दिवसाला आढळून येणारी रुग्णसंख्या वाढेल," असं कोविड सुपरमॉडेल पॅनलचे विद्यासागर यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितलं.


विद्यासागर हे हैदराबाद आयआयटीमध्ये प्राध्यापक आहेत. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला देशातील बहुसंख्य लोकसंख्येचं लसीकरण झालेलं नव्हतं असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. मात्र, ओमिक्रॉनने व्हेरिएंटने स्वतःला डेल्टाच्या जागी पुर्नप्रस्थापित करण्यास सुरूवात केल्यानंतर व्हेरिएंट वेगाने पसरू शकतो. देशात दररोज एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील. मात्र, मागील अनुभवातून आपण क्षमता सुविधा उभारल्या असून, कोणत्याही समस्यांशिवाय तिसऱ्या लाटेला तोंड देऊ शकतो, अशी माहिती विद्यासागर यांनी दिली.


देशातील रुग्णसंख्या 143 वर; एकाच दिवशी आढळले 26 रुग्ण


जगभरात चिंता व्यक्त होत असताना देशात शनिवारी तब्बल 26 जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 143 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासह 4 राज्यांत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात शनिवारी 8 रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण आकडा 48 वर पोहोचला. चार रुग्ण मुंबईत, तर तीन रुग्ण साताऱ्यात आढळून आले आहेत. एक रुग्ण पुण्यात आढळून आला आहे.


जगातील परिस्थिती कशी आहे?


आतापर्यंतच्या अभ्यासातून ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असून, जागतिक आरोग्य संघटनेनंही ओमिक्रॉनमुळे रुग्णसंख्या दीड दिवसांच्या कालावधीतच दुप्पट वेगाने वाढत असल्याचं म्हटलं आहे. ज्या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे, त्या ठिकाणी वेगाने पसरत आहे. ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दररोज 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post