...अन् अजित पवारांनी लगेच स्वतःचा राखीव सूट अमित शाहांना दिला; नक्की काय घडलं?

 



केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यादरम्यान अजित पवारांचं कौतुक होतंय. प्रवरानगरमधील कार्यक्रमानंतर अमित शाह पुण्यात मुक्कामी येणार होते, पण पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये सूट उपलब्ध नसल्याने प्रशासनासमोर मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र, अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेला राखीव सूट अमित शाहांना दिला. त्यांच्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दाखवून दिल्याचं बोललं जात आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवारी प्रवरानगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला अमित शाह यांनी हजेरी लावली. प्रवरानगरनंतर शाह पुण्यात मुक्कामाला येणार होते. मात्र, प्रशासनाने अमित शाह यांच्या मुक्कामासाठी खासगी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यास नकार दिला होता. तर पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये दोन सूट असून, ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रशासनानसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.


दरम्यान, अमित शाह यांच्या पुण्यातील मुक्काम संदर्भातील चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळाली. त्यांनी लगेच स्वतःसाठी राखीव असलेला पुणे सर्किट हाऊसमधील सूट अमित शाह यांना देण्याची सूचना प्रशासनाला केली. त्यानंतर शाह यांच्या निवासाची व्यवस्था उपमुख्यमंत्र्यांसाठीच्या राखीव सूटमध्ये करण्यात आली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेला सूट अमित शाह यांना दिल्यानं त्यांच्या या निर्णयाबद्दल कौतुक केलं जात आहे. राखीव सूट अमित शाहांना मुक्कामसाठी देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती समृद्ध आहे, अजित पवारांनी दाखवून दिल्याची चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही याबद्दल ट्विट केलं आहे. "देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते, हे कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत. हेच आहेत शरद पवार यांचे संस्कार!", असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे

असा आहे शाह यांचा पुणे दौऱ्यातील कार्यक्रम


सकाळी दहा वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह पुण्यातील सीएफएसएल कॅम्पस येथील इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता एनडीआरएफ जवानांसोबत भोजन करणार असून, दुपारी 2 वाजता Vamnicom च्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर साय 4:40 वाजता भाजप कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6:45 वाजता स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post