India Tour of South Africa : कसोटी मालिकेसाठी लोकेश राहुल भारताचा उप-कर्णधार

 


टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलचं आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्रमोशन झालं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी राहुलकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २६ डिसेंबरपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे या दौऱ्यात कसोटी मालिकेत खेळणार नाहीये.


काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या संघात अजिंक्य रहाणेची उप-कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्याच्याऐवजी रोहित शर्माला उप-कर्णधार नेमण्यात आलं. परंतू सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माने या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे भविष्यकाळात संघाची जबाबदारी सोपवण्याच्या दृष्टीने लोकेश राहुलकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं कळतंय.


२०१४ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या लोकेश राहुलने आतापर्यंत ४० कसोटी सामन्यांमध्ये २ हजार ३२१ रन्स केल्या आहेत. ज्यात ६ शतकं आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. काही वर्षापूर्वी राहुलला खराब कामगिरीमुळे संघातून बाहेर व्हावं लागलं होतं. परंतू यानंतर राहुलने स्वतःत सुधारणा करत संघात दमदार पुनरागमन केलं.


असा असेल भारताचा कसोटी मालिकेसाठीचा संघ -


विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post