सेनेच्या मंत्र्यांना शिवसैनिकांनी रोखले

 


कर्जत | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये होत असलेल्या कार्यक्रमावर कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर कार्यक्रमाला जात असणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना तालुक्यातील मिरजगाव येथे शिवसैनिकांनी रोखून धरले. तसेच महाविकास आघाडीचे घटक असणारे राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केला.


कर्जत येथे शनिवारी सकाळी तालुका शिवसेनेच्या पदाधिकार्यांची तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शहरांमध्ये होत असलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मिरजगाव येथे क्रांती चौकात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची गाडीला घेराव घालून कार्यक्रमास उपस्थित न राहण्याची मागणी करण्यात आली.


कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ. रोहित पवार हे महाविकास आघाडीचे आमदार म्हणून गेले दोन वर्षे मिरवत आहेत. पण महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांना आणि कार्यकर्त्यांना वेळोवेळी डावलून अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. तसेच कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकास कामांच्या बाबतीत विश्वासात घेतले जात नाही, असेच जर पुढील काळात होत असेल तर कर्जत तालुका शिवसेना भविष्यात आपली ताकद दाखवून देईल, असे कर्जत शिवसेना तालुका प्रमुख यादव यांनी सांगितले.


यावेळी युवा सेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, व्यापारी सेलचे महावीर बोरा, उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, अक्षय घालमे, शिवाजी बापू नवले, चंद्रकांत घालमे, शहर प्रमुख अक्षय तोरडमल, विभाग प्रमुख पोपट धनवडे, बबन दळवी, महेंद्र धोदाड, सुभाष सुद्रिक, बाळासाहेब निंबोरे, लक्ष्मण जगताप, अण्णा बागल, दीपक कांबळे, आप्पासाहेब शेगडे, अविनाश मते, अमोल सुपेकर, अकील पठाण, भारत काळे, अजित कानगुडे, राजू उकीरडे, लक्ष्मण जगताप, हरी बाबर, रवी कुसकुडे, उद्धव जाधव, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post