तळेगाव दिघे | येथील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम रात्रीच्यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांची रोकड लांबविली. शनिवारी (दि. 13) रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राममंदिराच्या पाठीमागील परिसरात इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा आहे. शेजारीच याच बँकेचे एटीएम आहे. शनिवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड केला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले.
शनिवारी सकाळी बँक कर्मचार्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे, हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर, राजेंद्र पालवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडीच्या घटनेचा तपास सुरु केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. संगमनेर शहर व तालुक्यात यापूर्वी बँकांचे एटीएम फोडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमले जात नसल्याने सध्या दरोडेखोरांच्या रडारवर एटीएम आहेत.
Post a Comment