साईमंदिरात बायोमेट्रिक पध्दतीने 10 हजार भाविकांना पासेस



 शिर्डी | कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध साईमंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या नियमांत शिथीलता करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने 15 हजार आणि यापुढे बायोमेट्रिक पध्दतीने 10 हजार अशा 25 हजार भाविकांना दर्शनपास देण्यात येणार असल्याचे साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.


गेल्या एक महिन्यापासून साईबाबांचे शिर्डी येथील मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दररोज पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. मात्र साईबाबा संस्थानच्या संकेतस्थळाची कुशलता तसेच दलालांच्या बनावट पासेसमुळे या कालावधीत साईभक्तांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सोमवार दि.15 रोजी काही भाविकांच्या खात्यातून ऑनलाईन पासेससाठी पैसे जमा झाले. मात्र पासेस मिळाले नाही.


याबाबत भक्तांना तक्रार निवारण करण्यासाठी संस्थानकडून योग्य मार्गदर्शन न झाल्याने अखेर भाविकांनी साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक चार समोर तीन तास ठिय्या आंदोलन करून संस्थान प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. काल दि.16 नोव्हेंबर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साईसंस्थानला 10 हजार बायोमेट्रिक दर्शनपास देण्यासाठी परवानगी दिली आहे. साईबाबा संस्थानने दि.8 नोव्हेंबर रोजी भाविकांसाठी ऑफलाईन दर्शन पासेस, लाडू प्रसाद तसेच साई प्रसादालय सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनास विनंती पत्र दिले होते.


त्यानंतर काल मंगळवारी यावर निर्णय होऊन श्री साईबाबा संस्थान प्रशासनाला कोव्हीड सुसंगत वर्तनाचे पालन करून दैनंदिन 10 हजार भक्तांना ऑफलाइन दर्शनासाठी मुभा देण्यात आली असल्याचे साईबाबा संस्थानची उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. यापुढे साईदर्शनासाठी 15 हजार ऑनलाइन आणि 10 हजार ऑफलाइन अशी एकूण 25 हजार भाविकांना साई मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र यादरम्यान कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून भाविकांनी शक्यतो ऑनलाइन दर्शन बुकिंग करूनच शिर्डीत यावे असे आव्हान साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post