विधान परिषदेवर आमदार नियुक्तीबद्दल लवकरच राज्यपालांची भेट घेणार : उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे |  बारा आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतचा पूर्ण निर्णय राज्यपालांचा आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपालांची भेट घेणार असून याबाबतची शिफारस करणार आहोत, असे सांगत राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील विधानाला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी लगावला.

राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात असून दोन डोसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नागरिकांना बूस्टर डोस दिला जाईल, असे सांगतानाच दिवाळीपर्यंत शाळा सुरू न करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिल्याचे ते म्हणाले. बूस्टर डोसबाबत बोलताना ते म्हणाले, दोन डाेसनंतर बूस्टर डोस देण्यासाठी राज्य सरकारची सहमती आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतरच बूस्टर डोसचा विचार केला जाईल. पण ज्या नागरिकांना स्वत:च्या पैशाने बूस्टर डोस घ्यावयाचा त्यांनी तो घेण्यास हरकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

दिवाळीपर्यंत शाळा नाहीच
टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत शाळा सुरू करणे योग्य नाही. काही संस्थाचालक तसेच पालकांचा या स्थितीत शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास विरोध होत आहे. यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेणार आहेत. महाविद्यालये नियमांचे पालन करून सुरू करण्यास हरकत नसल्याचे सरकारचे धोरण आहे. पण यासाठी सर्वांचे दोन डोस आवश्यक आहेत, असे पवार यांनी नमूद केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post